मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : 12 मार्च 1993 ला मुंबईत पहिली आणि भीषण बॉम्बस्फोट मालिका घडवणारा डॉन दाऊद इब्राहिम कराचीत दडून बसला आहे, असे म्हणतात. मात्र, दाऊदचे अस्तित्व आजही कराचीपेक्षा मुंबईत अधिक जाणवते. कराचीत बसून तो मुंबईला अजूनही आपल्या कारवायांच्या तालावर नाचवताना दिसतो.
दाउद इब्राहिम हा 80 च्या दशकात भारतातून पळाला. दुबईमार्गे कराचीमध्ये स्थायिक झाला. लष्करी अधिकार्यांसाठी उभारलेल्या अलीशान कॉलनीत तो राहतो, असे म्हणतात. दाऊदने 1993 ची बॉम्बस्फोट मालिका घडवणार्या त्याच्या काही साथीदारांनाही सहजपणे पाकिस्तानात नेले. भाऊ अनिस इब्राहिम आणि खास हस्तक छोटा शकील यांच्या मदतीने त्याने जगभरात आपले मोठे साम्राज्य उभारले आणि तो आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोस्ट वॉन्टेड डॉन बनला.
पाकिस्ताननेही दाऊद इब्राहिम त्यांच्याकडे नसल्याचा दावा वारंवार केला. मात्र तो फोल ठरला आहे. तो कराचीतच असल्याचे अनेक पुरावे वृत्तवाहीन्यांवर अधुन मधुन सादर केले जातात. भारतीय तपास यंत्रणा त्याच्या सर्व हालचालींवर करडी नजर ठेऊन आहेत. मात्र त्याच्यापर्यंत भारतीय यंत्रणा आजवर पोहोचू शकलेल्या नाहीत. मुंबई, ठाण्यात त्याचे हस्तक, त्याचे सुपारी किलर पकडले जातात. अगदी अलीकडेपर्यंत त्याची बहीण हसीना पारकरही मुंबईतील जमिनी बळकावत धमकावत राहिली. तिच्याशीच केलेल्या व्यवहारातून अल्पसंख्यक विकास मंत्री नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. याचा अर्थ दाऊदचे अस्तित्व आजही मुंबईत जाणवते.
मुंबई, दिल्ली निशाण्यावर
दाऊद पुन्हा सक्रीय झाला असून भारतात अतिरेकी कारवाया करण्याची तयारी करत असल्याची माहिती अलिकडेच समोर आली. मुंबई आणि दिल्ली ही शहरे त्याच्या निशाण्यावर आहेत. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहीमविरोधात एक एफआयरही दाखल केला आहे. एफआयरच्या माध्यमातून गेल्याच महिन्यात ही माहिती उघड झाली आहे. भारतातील महत्वाचे राजकीय नेते, प्रमुख उद्योजकांना लक्ष्य करण्यात येणार असून स्फोटके आणि घातक शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून विविध भागांमध्ये हींसाचार घडवून आणण्याची त्याची योजना आहे.
मुंबई पोलिसांनी गँगवॉर संपवले
मुंबई पोलिसांनी 2002 मध्ये मोक्का कायदा बनवल्यानंतर पुढच्या 08 ते 10 वर्षांमध्ये गँगवॉर संपवल. आता काही गँग्ज अस्तित्वात आहेत पण गँगवॉर राहिलेले नाही. पण दाऊदची बातमी मात्र नियमित येत असते. दर महिन्या – दोन महिन्यांनी दाऊदच्या नावाने धमकावले, खंडणी मागितली, खंडणी वसूल केली अशा बातम्या येत असतात. खंडणीचा हा पैसा मुंबईतून दाऊदकडे जातो आणि त्याच पैशांतून दाऊद दहशतवादी कारवायांना फायनान्स करतो इथपर्यंत आपल्या तपास यंत्रणा पोहोचल्या असल्या तरी मुंबईवर सतत डोळा ठेवणार्या दाऊदपर्यंत त्या आजवर पोहोचू शकलेल्या नाहीत.
मुंबईतील पहिल्या बॉम्बस्फोट मालिकेची 29 वर्षे
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईला बॉम्बस्फोटांच्या मालिकेने हादरवून सोडणारा 12 मार्च हा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस आहे. देशाच्या दुष्मनांनी दिलेल्या जखमा आणि हा दिवस मुंबईकर कधीही विसरु शकत नाहीत.
मुंबईत 1993 मध्ये घडवून आणलेल्या 12 साखळी बॉम्बस्फोटांनी अवघ्या देशाला हादरवले होते. या हल्लात 257 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 700 हुन अधिक जण जखमी झाले होते. मुंबई शेअर बाजार, काळबादेवी, शिवसेना भवन, एअर इंडिया इमारत, माहिमची मच्छिमार कॉलनी, सेन्चुरी बाजार वरळी, झवेरी बाजार, वांद्रयात हॉटेल सी-रॉक आदी ठिकाणांसह गर्दीच्या अशा 12 ठिकाणी सुमारे दोन तास हे स्फोट सुरू होते.
4 नोव्हेंबर 1993 रोजी याप्रकरणात 189 जणांविरोधात 10 हजार पानांचे पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले. पुढे हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. 19 एप्रिल 1995 पासून मुंबईतील टाडा न्यायालयात सुनावणी सुरु झाली.
बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातील आरोपींविरोधात आरोप निश्चिती, सरकारी पक्षाच्या साक्षीदारांचे जबाब, आरोपींच्या वकिलांनी केलेली उलट तपासणी, दोन्ही पक्षांचे युक्तीवाद पूर्ण होऊन संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. सप्टेंबर 2006 मध्ये न्यायालयाने निर्णय देणे सुरु केले. या प्रकरणात एकूण 123 आरोपी होते. 12 जणांना कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. तर, 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, ज्यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर 68 जणांना जन्मठेपेहून कमी शिक्षा सुनावली गेली होती. मात्र, त्यातील 23 जण निर्दोष सुटले.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला पिस्तूल आणि एके-56 रायफल्स ठेवल्याप्रकरणी नोव्हेंबर 2006 मध्ये दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. पुढे काही काळ सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु राहिली. मुंबईच्या टाडा न्यायालयाने आरोपी याकूब मेमन याला फाशी सुनावल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. अखेर 30 जुलै 2015 रोजी याकूब मेमनला फाशी देण्यात आली होती. तर स्फोटाचा मुख्यसूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असून तो अद्याप फरार आहे.