देवेंद्र फडणवीस : कुणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून मलिकांचा राजीनामा घेतला नाही? | पुढारी

देवेंद्र फडणवीस : कुणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून मलिकांचा राजीनामा घेतला नाही?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत जागा घेतली. अशा देशद्रोही व्यक्तीचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याशिवाय आमचा संघर्ष संपणार नाही. आम्हाला कोण संपवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांनाच आम्ही संपवू, असा इशारा माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिला. नवाब मलिक हटावच्या मागणीसाठी आझाद मैदानातून निघालेल्या भव्य मोर्चासमोर ते बोलत होते.

सत्तेपोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आंधळे झाले आहेत. कुणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही, हे सरकार कोणाच्या इशार्‍याने चालते आहे, असे सवालही फडणवीस यांनी केले.

पोलिसांनी मोर्चा रोखला

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या प्रचंड मोर्चाची सुरुवात आझाद मैदानात झाली. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा मेट्रो सिनेमाच्या चौकात अडवला. मेट्रोच्या पुढे हा मोर्चा सरकण्यापूर्वीच पोलिसांनी देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार भाजपचे आमदार आशिष शेलार, प्रसाद लाड, मंदा म्हात्रे, गणेश नाईक, कालिदास कोळंबकर, राहुल नार्वेकर, निलेश राणे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि येलो गेट पोलीस ठाण्यात आणून सोडून दिले. मोर्चाची सांगता झाल्याचे जाहीर केल्यानंतरच मोठ्या संख्येने जमलेले मोर्चेकरी आपापल्या दिशेने निघून गेले.

मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर व्हीडीओ बॉम्ब टाकून फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. तोच धागा पकडून फडणवीस म्हणाले, या पुढील काळातही अशाप्रकारचे आणखी बॉम्ब फोडल्याशिवाय राहणार नाही.

मलिक आणि दाऊद

फडणवीस म्हणाले, मार्च 1993 चे मुंबई बॉम्बस्फोट सरदारशाह वली खान, याकुब मेमन यांनी घडवून आणले. यातील आरोपी सरदारशाह वली खानला दुहेरी जन्मठेप झाली आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमनेच हे स्फोट घडवले. त्याची बहिण हसिना पारकरकडून मंत्री नवाब मलिक यांनी मात्र मुंबईतील 2 हजार चौरस फुट जमीन सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. या आपल्या कंपनीमार्फत केवळ 25 रुपयाला स्क्वेअर फुटांनी विकत घेतली. सलीम पटेलशी हा व्यवहार केला. विक्रीपत्रकावर सरदारशाह वली खान, सलीम पटेल व नवाब मलिक यांचा मुलगा अशा तिघांचा फोटो आहे. सलीम पटेल व सरदारशाह वली खान यांनी खोटी कागदपत्रे तयार केली असली तरी सूत्रधार हसिना पारकर आहे.नवाब मलिक यांनी काळ्या पैशातून मनीलाँड्रींग केले, अशा मंत्र्याला महाविकास आघाडी मदत करते. ही लाजीरवाणी गोष्ट आहे.

मलिकांचाच राजीनामा का नाही?

अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जातो, संजय राठोडांचा राजीनामा घेतला जातो. मग दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? तुम्ही कुणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही आहात? असे सवाल करीत फडणवीस म्हणाले, शरद पवार हे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, असे सांगतात. मात्र ; आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही संघर्ष करत राहणार आहे. मोदी यांचे आम्ही सैनिक आहोत. त्यांचा आम्हाला आशिर्वाद आहे. यह तो झाँकी है, अभी तो पिक्चर बाकी है, अब रुकने का नाही, डरने का नाही’ असे म्हणत फडणवीस यांनी पुढील लढाईची हाक दिली.

उद्धव, उत्तर द्यावे लागेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधत फडणवीस म्हणाले, तुमचे आणि आमचे जमत नसेल ते सोडून द्या. मात्र, तुम्हाला एक दिवस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उत्तर द्यायचे आहे. तुम्हाला विचारले जाईल की अशी व्यक्‍ती तुमच्या मंत्रिमंडळात कशी? तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल? पण आम्ही शिवसेनाप्रमुखांना सांगू, की बाळासाहेब यासाठी आम्ही संघर्ष केला. पण आपलेच सुपूत्र मुख्यमंत्री होते. सत्तेसाठी ते एवढे आंधळे झाले की ते मलिकांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. कारण मलिकांचा राजीनामा घेतला तर माझे सरकार जाईल, अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोले हाणले.

ठाकरी बाणा कुठे आहे?

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले, ठाकरी बाणा गेला कुठे ? आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर एका मिनिटात नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला असता. मंत्री मलिक यांचा राजीनामा हे सरकार घेत नाहीत. महाविकास आघाडी सरकारची लाज वाटते. मलिक यांच्या समर्थनासाठी महाविकास आघाडीतील मंत्री मंत्रालय समोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करतात. म्हणजे, देशद्रोह्याला पाठिशी घालतात.गेली 4 दिवस अधिवेशनात नवाब मलिक यांचा राजीनामा मागत आहे.पण ;त्यांचा राजीनामा घेतला जात नाही.विधीमंडळात काल देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी सरकारचे कपडे उतरण्याचे काम पेनड्राईव्हच्या माध्यमातून पुराव्यासहित केले. त्यामुळे फडणवीस यांना कोणी संपवू शकत नाही. उलट, अशाच प्रवृत्तींना भाजप संपविल्याशिवाय राहणार नाही.

Back to top button