नवाब मलिक : तपास यंत्रणांनी खोट्या गुन्ह्यात गोवले

नवाब मलिक : तपास यंत्रणांनी खोट्या गुन्ह्यात गोवले

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : तपास यंत्रणा कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवून आपली बदनामी करू शकत नाही. असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावतीने ईडीच्या कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर अ‍ॅड. अमित देसाई यांनी केला तसेच गेल्या 16 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या मलिक यांची सुटका करावी अशी मागणी करत आपला युक्तीवाद पूर्ण केला. गुरूवारी ईडीच्यावतीने सॉलीसिटर जनरल अनिल सिंग युक्तीवाद करणार आहेत.

नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. विशेष न्यायालयाने त्यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र ईडीद्वारे करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असून राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे असा दावा करत नवाब मलिक यांनी अ‍ॅड. अमित देसाई व अ‍ॅड. फिरोज भरुचा यांच्या मार्फत हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. तसेच ईसीआयआर रद्द करण्यात यावा व न्यायालयाकडून जामीन देण्यात यावा अशी विनंती मलिक यांनी याचिकेद्वारे केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मलिकांच्या वतीने अ‍ॅड. अमित देसाई यांनी युक्तिवाद करताना राजकीय सूड उगवण्यासाठी मलिक यांना ईडीने अटक केली. संबंधित व्यवहार सुमारे वीस वर्षांपूर्वी झाला आहे. कुर्लामधील या जागेची मूळ मालकी मुनिरा प्लंबर यांची होती आणि त्यांनी कायदेशीर पध्दतीने ती मलिक यांना दिली आहे. मात्र आता त्यांनी आपला जबाब फिरवला असून यामध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप केला आहे, अशी पार्श्वभूमी दाखवून ईडी कोणाला अटक करु शकत नाही असे अ‍ॅड. देसाई यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news