Women’s Day : आजपासून महिला अंमलदार ८ तास ऑनड्युटी | पुढारी

Women's Day : आजपासून महिला अंमलदार ८ तास ऑनड्युटी

मुंबई/ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद करण्यात आलेले आठ तासांचे कर्तव्य मंगळवारपासून महिला दिनाच्या (Women’s Day) मुहूर्तावर पुन्हा सुरू होत आहे.

मुंबई पोलीस आयुक्‍त संजय पांडे यांनी विशेष कार्यालयीन आदेश जारी करत मुंबई पोलीस दलातील महिला अंमलदारांना ही महिला दिनाची भेट दिली. पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी योग्य नियोजन संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना करावे लागणार असल्याने आठ तास कर्तव्यासाठी दोन पर्याय कार्यालयीन आदेशाद्वारे देण्यात आले आहेत.

पहिला पर्याय : सकाळी 8 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 10, रात्री 10 ते सकाळी 8
दुसरा पर्याय : सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 11, रात्री 11 ते सकाळी 7

यानुसार मुंबईतील महिला अंमलदार आता कर्तव्य बजावतील. त्यासाठी दोन्ही पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याची मुभा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलात मोठ्या संख्येने महिला कर्तव्य बजावत असतात. या महिलांना कर्तव्यासोबत आई, पत्नी, सून, गृहिणी अशा विविध कौटुंबिक जबाबदार्‍याही पार पाडाव्या लागतात.

पोलीस खात्यात 12 तासांचे कर्तव्य असले तरी विशेष बंदोबस्त, आंदोलन, मोर्चे तसेच सण-उत्सावांमुळे कर्तव्याचे तास निश्‍चित नसतात. या काळात महिला अंमलदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन पुणे, नागपूर, औरंगाबाद जिल्हा पोलीस दलांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर महिला अंमलदारांची ड्युटी 8 तासांची करण्यात आली होती. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता हा पॅटर्न सगळीकडेच स्वीकारला जात असून, मुंबई पोलीस दलातील महिला अंमलदारही रोज 8 तास कर्तव्यावर तैनात असतील.

8 तास कर्तव्याचे जनक (Women’s Day)

मुंबई पोलीस दलात कर्तव्याला असलेले पोलीस नाईक रवींद्र पाटील यांनी 8 तास कर्तव्याचे मॉडेल तयार केले. तत्कालीन पोलीस आयुक्‍त दत्ता पडसलगीकर यांनी 5 मे 2016 रोजी मुंबईतील देवनार, चुनाभट्टी, काळाचौकी, आझाद मैदान, मुलुंड, नवघर, विलेपार्ले, पवई, बोरिवली, दहिसर, ओशिवरा, सांताक्रूझ या दहा पोलीस ठाण्यात हे मॉडेल स्वीकारले आणि बघता बघता आज हे मॉडेल राज्यव्यापी झाले आहे.

Back to top button