
मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेचा एक लिपिक अवघ्या 6 वर्षांत किती कमाई करू शकतो? उत्तर ऐकाल तर चक्रावून जाल. महापालिकेच्या आरोग्य खात्यातील एका लिपिकाने त्याच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा तब्बल 47 टक्के जास्त मालमत्ता कमावली.
सेवेत असताना ज्ञात उत्पनापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप असलेले मुंबई महानगरपाालिकेच्या आरोग्य विभागाचा लिपीक प्रदीप पूनमचंद अग्रवाल याच्याविरुद्ध आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
जानेवारी 2015 पासून प्रदीप अग्रवाल लिपीक म्हणून कार्यरत होता. 20 मार्च 2019 पर्यंत त्याने लाखो रुपयांची संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली असता चौकशीदरम्यान प्रदीप अग्रवाल याने सेवेत असताना ज्ञात उत्पनापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडे सुमारे सहा लाख रुपयांची मालमत्ता ज्ञात उत्पनापेक्षा अधिक होती. ही मालमत्ता 47 टक्के जास्त असल्याने त्याच्याविरुद्ध एक विशेष अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला होता.
त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन दोन दिवसांपूर्वी प्रदीप अग्रवाल याच्याविरुद्ध या अधिकार्यांनी गैरमार्गाने बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत लवकरच त्याची पोलिसाकडून चौकशी करुन जबाब नोंदविण्यात येणार आहे. अग्रवाल यास अद्याप अटक झालेली नाही. परिणामी अजूनही तो महापलिकेच्या सेवेत कायम आहे, हे विशेष.