CM Thackeray : युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला हा निर्णय | पुढारी

CM Thackeray : युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला हा निर्णय

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहण्याच्या तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा, विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत त्यांची काळजी घेण्याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला प्राधान्याने केंद्राशी बोलावे असे सांगितले आहे. (CM Thackeray)

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून उद्योग, शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. मुख्य सचिवांना केंद्र शासनाशी समन्वय साधून या नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

CM Thackeray : ५ रशियन विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर रशियाने युक्रेनच्या (Ukraine) अनेक शहरांवर आज (गुरूवार) क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. या हल्ल्यात ४० हून अधिक युक्रेनियन सैनिक आणि १० नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. तर प्रती हल्ल्यात युक्रेनने सुमारे ५० रशियन मारल्याचा दावा केला आहे. तसेच पूर्व युक्रेनमध्ये ५ रशियन विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचाही दावा केला आहे.

आंतरराष्ट्रीय समूदायाच्या दिलेल्या अत्यंत कडक इशाऱ्यानंतरही रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई केली आहे. लष्करी कारवाईला सुरुवात झाल्यानंतर उभय देशांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत.

दरम्यान, रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनमध्ये नागरी ठिकाणे तसेच लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. रशियाने युक्रेनमध्ये जवळपास ३० हून अधिक ठिकाणी कलीबर क्रुझ क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ले केले आहेत.

संयुक्त दलाच्या ऑपरेशनमध्ये हल्ला करण्यासाठी आलेले ५ विमान आणि १ हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याचे युक्रेन (Ukraine) लष्करातील एका अधिकाऱ्याने सांगितले. रशियन सैन्याने युक्रेनमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे.

तर युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. राजधानीच्या मुख्य विमानतळाजवळही गोळीबाराचा आवाज ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे.

Back to top button