नारायण राणेंच्या अधिश या आलिशान बंगल्याचे पुन्हा उद्या मोजमाप होणार!

नारायण राणेंच्या अधिश या आलिशान बंगल्याचे पुन्हा उद्या मोजमाप होणार!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील 'अधिश' या आलिशान बंगल्याच्या बांधकामाचे पुन्हा सोमवारी (ता.२१) मोजमाप घेण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने सांताक्रूझ पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली असल्याचे समजते.

महापालिकेच्या या कार्यवाहीला राणे कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राणे समर्थक कारवाईत अडथळा आणण्याची शक्यता असल्यामुळे हे पोलीस संरक्षण घेण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
जुहू तारा रोड येथील नारायण राणे यांच्या 'अधिश' बंगल्याच्या मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार पालिकेकडे आली होती. त्यानुसार अंधेरी के-पश्चिम विभागाने गुरुवारी रात्री राणे यांना मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मधील कलम 488 अन्वये नोटीस बजावली. त्यानुसार के-पश्चिम विभाग आणि इमारत प्रस्ताव विभागातील अधिकार्‍यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास जुहू तारा रोड येथील 'अधिश' बंगल्यातील पाहणी केली.

काही ठिकाणी मोजमाप व कागदपत्रांची पडताळणी केली. मात्र अजून बंगल्याच्या काही भागातील मोजमाप बाकी असल्यामुळे सोमवारी पुन्हा पथक राणे यांच्या बंगल्यात जाणार असल्याचे समजते. बंगल्याची पाहणी सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास करण्यात येणार असून त्यासाठी पोलिसांनी संरक्षणही दिल्याचे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

या पाहणीत बंगल्याच्या काही भागांतील राहिलेले मोजमाप घेऊन कागदपत्रांची पडताळणीही करण्यात येणार आहे. त्यानंतर मंजूर आराखडा व केलेल्या बांधकामाचा अभ्यास करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास ते पाडण्यासाठी राणे यांना मुदत देण्यात येईल, अन्यथा त्या बांधकामावर पालिकेतर्फे कारवाई करण्यात येईल, असे इमारत प्रस्ताव विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news