रवींद्र चव्हाण : महाआयटीचे बजेटच 356 कोटी, मग 25 हजार कोटींचा घोटाळा कसा?

रवींद्र चव्हाण : महाआयटीचे बजेटच 356 कोटी, मग 25 हजार कोटींचा घोटाळा कसा?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याचे पाच वर्षांचे बजेटच 356 कोटी असताना महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा होईलच कसा, असा सवाल माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी आता केला आहे. प्रकरणे अंगाशी आल्यामुळेच शिवसेना नेते संजय राऊत खोटेनाटे आरोप करीत आहेत. त्यांनी रोज उठून आरोप करण्याचे धंदे सोडून द्यावेत, असेही चव्हाण यांनी सुनावले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यात 25 हजार कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप संजय राऊत यांनी मंगळवारी भरगच्च पत्रकार परिषदेत केला होता. त्यापैकी पाच हजार कोटींच्या घोटाळ्याची कागदपत्रे आपल्याकडे आली आहेत, असे सांगून राऊत यांनी थेट फडणवीस यांच्यावरच आरोप केले.

या प्रकरणाचा सूत्रधार नागपूर येथील फडणवीस यांचा निकटवर्तीय अमोल काळे असल्याचे राऊत म्हणाले होते. त्यावर काळेदेखील गुरुवारी समोर आले आणि आपण कोणतेही सरकारी टेंडर घेतले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काळे यांच्या पाठोपाठ रवींद्र चव्हाण यांनीही संजय राऊत यांच्या आरोपांचा समाचार घेतला.

पत्रकारांशी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, संजय राऊत हे रोज उठून नवेनवे आरोप करत आहेत. त्यांना आपला टीआरपी कायम ठेवण्याची चिंता असते. त्यासाठीच ते वाट्टेल ते बोलतात. मुळात फडणवीस यांच्या राजवटीत राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे पाच वर्षांचे बजेट हे 356 कोटी होते. याचा विचार केला तर पाच वर्षात 25 हजार कोटींचा घोटाळा होईलच कसा याचे तरी भान राऊत यांनी बाळगायला हवे, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

राऊत हे दररोज माहिती नसताना धडधडीत खोटे बोलत असतात. त्यांनी उगाच रेटून खोटे बोलणे सोडून द्यायला हवे. त्यांनी आरोप करताना आधी खरे काय ते माहीत करून घ्यावे आणि मग बोलावे, असा सल्लाही चव्हाण यांनी दिला.

दरेकरांनी उडवली खिल्‍ली

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राऊत यांच्या आरोपांची खिल्‍ली उडवली. आयटीचे बजेट किती असते ते तपासून राऊत यांनी आरोप केला असता तर त्यांचीही प्रतिष्ठा राहिली असती. मात्र, ज्या खात्याचे बजेटच शे-दोनशे कोटी तिथे 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा जावईशोध राऊत यांनी लावला. सगळा मूर्खपणा सुरू आहे.

वाट्टेल ते बोलले की माध्यमांमध्ये येते आणि वाहिन्यांनाही असे सनसनाटी काही तरी लागते. त्यामुळे राऊत यांनाही खोटे रेटून बोलण्याचा रोग जडला आहे. मात्र, या धडपडीत ते सतत तोंडावर आपटताना दिसतात, हे सांगून दरेकर म्हणाले, अमोल काळे पळून गेले, असे राऊत यांनी जाहीर केले तेच काळे वाहिन्यांवर येऊन बोलले आणि आपण देशातच आहोत, असेही त्यांनी सांगितले.

कायदेशीर कारवाई करणार : अमोल काळे

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाआयटी घोटाळ्याचे सूत्रधार म्हणून उल्लेख केलेले अमोल काळे हे समोर आले आहेत. त्यांनी गुरुवारी एक निवेदन प्रसिद्ध करत आपली बाजू मांडली. यावेळी अमोल काळे आपण राज्यात कोणतेही सरकारी कंत्राट घेतलेले नाही आणि ज्यांनी आपल्यावर चुकीचे आरोप केले, त्यांच्याविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करू, असे सांगितले आहे.

अमोल काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मी एक खासगी व्यावसायिक आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्षही आहे. माझ्यासंदर्भात काही नेत्यांकडून वक्‍तव्ये केली जात आहेत. माझ्या उत्पन्‍नाचा तपशील आयकर खात्याला सादर करण्यात आलेल्या विवरणपत्रात आहे. मी महाराष्ट्र सरकारचे कोणतेही कंत्राट घेतले नाही. तरीही काही नेत्यांकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी माझी बदनामी केली जात आहे.

* संजय राऊत यांनी काळे कुठे गायब झाले, अशी शंका उपस्थित केली होती. त्यावर, मी कुठेही पळून गेलेलो नाही. अशा लोकांविरोधात मी कायदेशीर कारवाई सुरू करत आहे, असा इशारा अमोल काळे यांनी दिला.

* शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 25 हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या घोटाळ्यात अमोल काळे आणि विजय ढवंगाळे हे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले होते.

logo
Pudhari News
pudhari.news