पुढारी ऑनलाईन डेस्क :
Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. भाजपचं लोक मला तीनवेळा भेटले. त्यांनी वारंवार मला सांगितले की तुम्ही मध्ये पडू नका. आमचं सरकार येण्यासाठी मदत करा. जर तुम्ही लोकांनी मदत केली नाही. तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, अशा धमक्या देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. हे सरकार पडणार नाही हे जेव्हा त्यांना मी सांगितले तेव्हा माझ्या नातेवाईकांवर ईडीच्या धाडी पडल्या. तिहार जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या, असा दावा त्यांनी केला.
राऊत यांच्या या पत्रकार परिषदेवर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. आज फिर एक बिल्लीने दहाड़ने की कोशिश की है! असे खोचक वक्तव्य त्यांनी ट्विटमधून केले आहे.
मी जिथे कपडे शिवले तेथेही ईडीने तपास केला असल्याचे राऊत यांनी सांगितले. फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप त्यांनी केला. पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरणी बोलताना राऊत यांनी, राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात २० कोटी गेल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला.