पाचशे रुपये मागितले म्हणून नातवाने केली आजोबांची निर्घृण हत्या | पुढारी

पाचशे रुपये मागितले म्हणून नातवाने केली आजोबांची निर्घृण हत्या

कुर्ला; पुढारी वार्ताहर : उधार दिलेले पाचशे रुपये परत मागितले म्हणून नातवाने रागावून आजोबांची निर्घृण हत्या केल्याची घटना वडाळा येथे घडली आहे. फरार असलेला नातू सुशांत राम सातपुते (21) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

75 वर्षीय लक्ष्मण घुगे वडाळा येथील कोरबा मिठागर येथे आपल्या पत्नी आणि मुलासह राहात होते.त्यांना एक मुलगा आणि चार मुली आहेत. त्यातील सर्वात मोठ्या मुलीचा मुलगा सुशांत आजोबांच्या घरी येत जात असे. तो व्यसनी होता. त्याने आजोबा लक्ष्मण घुगे यांच्याकडून काही दिवसांपूर्वी 500 रुपये उधार घेतले होते. त्यानंतर घुगे वारंवार सुशांतकडे ते पाचशे रुपये परत मागत असत. दि. 9 रोजी घुगे घरी एकटे असताना सुशांत त्यांच्या घरी आला होता.

घुगे यांनी त्याच्याकडे उधार घेतलेले पैसे मागितले. यावर सुशांत प्रचंड संतापला आणि त्याने बांबूने घुगेंना मारहाण केली.डोक्यावर आघात केल्याने घुगे गंभीर जखमी झाले. त्यांना शेजार्‍यांनी केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुशांतने मुंबईबाहेर पळ काढला होता. त्याला पनवेल स्थानकाबाहेर अटक करण्यात आली.

Back to top button