

मुंबई : विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीमुळे अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ जाहीर करण्यात आली असून आता तिसरी विशेष फेरीदेखील घेण्यात येणार आहे. ५ सप्टेंबर रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना नव्या फेरीत प्रवेशाची संधी मिळणार आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या विशेष फेरीत तब्बल ३७ हजार ७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
राज्यभरात प्रथमच संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. यासाठी राज्यातील ९ हजार ५३५ कनिष्ठ महाविद्यालयांत एकूण २१ लाख ५९ हजार २३२ जागांची क्षमता निश्चित करण्यात आली होती. या जगावर यंदा १४ लाख ७९ हजार ६५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी १३ लाख ४३ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला. आतापर्यंत १३ लाख १२ हजार ७८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. 'ओपन टू ऑल' विशेष फेरीअंतर्गत ३८ हजार ८५३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. त्यापैकी २ सप्टेंबरपर्यंत ३७ हजार ७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यात कॅप फेरीत ३४ हजार २९५ व विविध कोट्यांतून २ हजार ७७९ इतके प्रवेश झाले आहेत.
विभागनिहाय आकडेवारीनुसार, मुंबईत सर्वाधिक १२ हजार ६९५ प्रवेश, तर पुण्यात ६ हजार ६६५, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ हजार ६३, नाशिकमध्ये ३ हजार ८७०, नागपूरमध्ये २ हजार ४०३, कोल्हापूरमध्ये २ हजार ९४५, अमरावतीत २ हजार ६९२ आणि लातूरमध्ये १ हजार ७४१ प्रवेश झाले आहेत. अद्याप काही विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित न केल्यामुळे 'ओपन टू ऑल' ही विशेष फेरी ३ ते ९ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
३ सप्टेंबरला नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी किंवा भाग-१ मध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ०४ सप्टेंबरला प्रवेश क्षमता वाढवली जाणार असून ५ सप्टेंबरला रिक्त जागा प्रदर्शित केल्या जाणार आहेत. ६ ते ७सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थी प्रवेश अर्जाचा भाग २ म्हणजेच पसंतीक्रम भरू शकतील. ८ सप्टेंबर रोजी अलॉटमेंट जाहीर होणार असून ८ व ९ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचे आहेत. आतापर्यंत अकरावी प्रवेशाच्या चार नियमित आणि दोन अतिरिक्त विशेष फेऱ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली.
अकरावी प्रवेश प्रक्रियेत विविध विभागांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वेगवेगळा दिसून आला आहे. मुंबई विभागाने २ लाख ९७ हजार ७३२ प्रवेशांसह राज्यात आघाडी घेतली असून त्यात वाणिज्य शाखेचा वाटा सर्वाधिक आहे. पुणे विभागाने २ लाख ३१ हजार ५१४ प्रवेशांसह दुसरे स्थान मिळवले. नाशिक १ लाख ४६ हजार २३३ व छत्रपती संभाजीनगर विभागात १ लाख ६१ हजार ३१, कोल्हापूर विभागात १ लाख ३२ हजार १६८ व नागपूर १ लाख ३४ हजार ४३३ प्रवेश झाले आहेत.