मुंबई महापालिका बजेट : शिक्षण विभागासाठी २८७०.२४ कोटींची तरतूद | पुढारी

मुंबई महापालिका बजेट : शिक्षण विभागासाठी २८७०.२४ कोटींची तरतूद

मुंबई, पुढारी वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२२-२३ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांनी बुधवारी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्याकडे सादर केला. त्यात शैक्षणिक विकासासाठी 256 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

2022-23 या वर्षासाठी 500 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. तर गतवर्षी 2021-22 होती 244 कोटी रुपये इतकी तरतुद होती. २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २८७०.२४ कोटी इतकी तरतूद केली आहे.

या बजेटमध्ये शिक्षण विभागासाठी करण्यात आलेली महत्वाची तरतूद

  • २२४ संगणक प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण ११.२० कोटींची तरतूद
  • शाळा व्यवस्थापन माहिती यंत्रणा – ५७ लाख
  • नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नऊ लाखांची तरतूद. यामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार.
  • मुलींची उपस्थिती भत्ता प्राथमिकसाठी ७ कोटी, माध्यमिकसाठी ४७ लाख
  • बेस्ट प्रवासासाठी प्राथमिक ३ कोटी, माध्यमिक १.२५ कोटी
  • बालवाडी वर्गांच्या सक्षमीकरणासाठी ९.०५ कोटींची तरतूद
  • केंब्रिज विद्यापीठाशी संलग्लित आय.जी.सी.एस.ई व आयबी शिक्षण मंडळाशी शाळा जोडण्यासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • कौशल्य प्रशिक्षणासाठी १.४० कोटी
  • शिक्षण विभागांच्या उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी १ कोटींची तरतूद

2022-23 मधील नवीन योजना

केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित आय.जी.सी.एस.ई. ( International General Certificate of Secondary Education) व आय. बी (International Baccalaureate) शिक्षण मंडळाच्या शाळांची उभारणी करणार

बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सर्वोत्तम व सर्वांगीण शिक्षण देण्याकरिता महाराष्ट्र बोर्डासह सीबीएसई, आयसीएसई या बोर्डाचे शिक्षण देण्यात येत आहे.

केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित आय.जी.सी.एस.ई. (International General Certificate of Secondary Education) अभ्यासक्रम जगातील शिक्षणाचे दर्जेदार माध्यम असून सदर बोर्डाचा अभ्यासक्रम सुरु केल्याने मुंबईतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल.

तसेच आतंरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण महापालिकेमार्फत विद्यार्थ्यांना देण्याकरिता आय.बी (international Baccalaureate) या अग्रगण्य आतंरराष्ट्रीय शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात चांगले करियर घडविण्यास मदत होईल.

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित आय.जी.सी.एस.ई. (International General Certificate of Secondary Education) व आय. बी (International Baccalaureate) बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरु करण्यात येणार आहे.

शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन करणार

महानगरपालिका शालेय विद्यार्थ्यांना खगोलीय घडामोडींचे ज्ञान व त्या विषयातील जिज्ञासू वृत्ती वाढविण्याकरिता २५ खगोलीय प्रयोगशाळा प्रायोगिक तत्वावर स्थापन करण्यात येणार

खगोलशास्त्रीय प्रयोगशाळेमध्ये चार दुर्बिण (Telescope), स्पेक्ट्रोस्कोप, चंद्र दिनदर्शिका (MOON Calendar), खगोल छायाचित्रणाकरिता एक ॲडॅप्टर या वस्तू उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

खगोलशास्त्रीय प्रयोगशाळांमुळे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे खगोलशास्त्रीय ज्ञान वाढीस लागून त्यांच्यात कुतूहल निर्माण होईल. तसेच खगोलीय बदलांचे निरिक्षण केल्याने त्यांच्यातील निरिक्षण, आकलन क्षमता व एकाग्रता यात वाढ होऊन संशोधन वृत्ती जागरुक होण्यास मदत होईल.

शाळांमध्ये बोलक्या संरक्षक भिंतींची निर्मिती

विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील एखादी संकल्पना स्पष्ट करित असताना सदर आशयाचे चित्र दाखविले असता ती संकल्पना विद्यार्थ्यांस लवकर समजते. शालेय इमारतीच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूस विद्यार्थ्यांना शैक्षणिक, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारीचे संदेश देणारे चित्र चित्रित करण्यात येणार आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट नजरेस आणून दिल्याने विद्यार्थ्यांची आकलन व अध्ययन क्षमता वाढेल. त्याचप्रमाणे शालेय इमारत व परिसर सुशोभित होईल. शाळांतील रंगकामामुळे स्वच्छता राखली जाऊन शैक्षणिक वातावरणही चांगले होईल.

हेही वाचा

Back to top button