डेंग्यू : मुंबईकरांसाठी हा धोक्याचा इशारा डेंग्यू ने घेतली कोरोनाची लक्षणे | पुढारी

डेंग्यू : मुंबईकरांसाठी हा धोक्याचा इशारा डेंग्यू ने घेतली कोरोनाची लक्षणे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : डेंग्यू ने घेतली कोरोनाची सर्दी अन् खोकला लक्षणे. कोरोनाच्या साथीमध्ये दुसरा पावसाळा आला आणि दरवर्षाचा पाहुणा असल्यासारखा डेंग्यूही दाखल झाला. यंदा मात्र या पाहुण्याने आपली लक्षणे बदलली आहेत. स्वतःची खास लक्षणे सोडून डेंग्यूने कोरोनाची लक्षणे दाखवण्यास सुरुवात केल्याने मुंबईकरांसाठी हा धोक्याचा इशारा होय.

डोळे दुखणे, डोके दुखणे, स्नायू दुखणे, हाडे दुखणे, मळमळणे, उलट्या होणे आणि प्रचंड ताप ही डेंग्यूची माहीत असलेली लक्षणे आहेत. यातले एकच लक्षण कोरोनाशी नाते सांगणारे होते ते म्हणजे ताप येणे.

बाकी सर्व लक्षणे डेंग्यूची म्हणून स्वतंत्र राहिली. यावर्षी मात्र कोरोना झाल्यानंतर जाणवणारी लक्षणेही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिसू लागली आहेत. ताप आहेच, याशिवाय सर्दी, प्रचंड खोकला ही लक्षणेही डेंग्यूने दाखवण्यास सुरुवात केली. म्हणजे डेंग्यूची आणि कोरोनाची लक्षणे एक झाली.

परिणामी डेंग्यूचा संशय आला तरी कोरोनाची चाचणी करणे मुुुंबईकरांसाठी आवश्यक झाले आहे. डेंग्यूमध्ये रुग्णास ताप,पांढर्‍या पेशी आणि प्लेट्सलेट कमी होत होत्या.रक्तातील न्यूट्रॉफिन खाली जाणे हे डेंग्यू ओळखण्याचे मुख्य लक्षण होते.

आता मात्र अनेक रुग्णांमध्ये सर्दी,ताप आणि खोकला या लक्षणांची भर पडल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ.पार्थिव संघवी यांनी सांगितले.यावर्षी नेहमीपेक्षा डेंग्यूचे रुग्ण 10 ते 12 टक्के वाढले आहेत. त्यामुळे एखाद्यास सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे असल्यास कोरोना संसर्गच असेल असे नाही तर हा डेंग्यूदेखील असू शकतो.

त्यामुळे कोरोनासह डेंग्यूची चाचणी करणे गरजेचे असल्याचे बॉम्बे रुग्णालयातील डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले. 2019 मध्ये डेंग्यूचे 920 रुग्ण आढळले होते आणि 3 मृत्यूची नोंद झाली आहे. 2020 मध्ये ही संख्या 129 आणि 3 मृत्यूपर्यंत घसरली.

तर 2021 मध्ये आतापर्यंत 74 डेंग्यूची प्रकरणे नोंद झाली आहेत. एकही रुग्ण दगावलेला नाही. 1 ते 11 जुलैदरम्यान केवळ आठ रुग्णांचे निदान झाल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे.

Back to top button