पॉर्न फिल्म च्या थेट प्रसारणाची होती तयारी | पुढारी

पॉर्न फिल्म च्या थेट प्रसारणाची होती तयारी

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : हॉटशॉट अ‍ॅप निलंबित झाल्यानंतर राज कुंद्राने प्लॅन बी बनवला होता. पॉर्न फिल्मचे थेट प्रसारण करण्याचा त्याचा इरादा होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या चित्रपटांमधील सर्व बोल्ड कंटेंट काढून प्ले स्टोरवर पुन्हा हॉटशॉट सुरू करण्याची तयारी केली होती. गुगल प्लेने संपर्क साधलेल्या मेलचा तपशीलही पोलिसांच्या हाती लागला आहे.

त्याचबरोबर बॉलीफेम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मॉडेल आणि अभिनेत्रींकडून लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याची तयारी त्याने केली होती. राज कुंद्रा आणि त्याचा माजी पीए उमेश कामत याच्या मोबाईल चॅटमधून ही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राज कुंद्राला अटक केल्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीही वाढणार आहेत. अर्थात शिल्पाचा राजच्या कारनाम्यात थेट सहभाग नसला तरीही तिची चौकशी केली जाऊ शकते.

या प्रकरणातल्या एका मॉडेलने समोर येऊन या प्रकरणी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज कुंद्रा हाच यामागचा सूत्रधार आहे, असे या मॉडेलने सांगितले आहे. तसंच या प्रकरणाची शिल्पा शेट्टीला म्हणजेच राज कुंद्राच्या पत्नीला माहिती होती, असेही तिने म्हटले आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे.

या मॉडेलने केलेल्या दाव्यानुसार कंपनीच्या डायरेक्टर्स आणि भागीदारांमध्ये शिल्पा शेट्टीच्या नावाचा समावेश आहे. जेव्हा एखादी व्यक्ती कंपनीची डायरेक्टर होते तेव्हा तिला कंपनीत काय सुरू आहे याची कल्पना नसते असे कसे काय होईल? त्याचप्रमाणे राज कुंद्राच्या कंपनीची डायरेक्टर असलेल्या शिल्पा शेट्टीला या पॉर्न प्रकरणातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आता शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली पाहिजे, तिला राजच्या पॉर्न फिल्म रॅकेटबाबत माहिती आहे, असा दावा या मॉडेलने केला आहे.

राज कुंद्रा हा विहान कंपनीच्या माध्यमातून पॉर्न व्हिडीओ निर्मिती, प्रसारण आणि आर्थिक उलाढालीबाबत लक्ष ठेऊन होता, तर राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करत होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत होती.

त्यामुळे राज कुंद्रा याच्या अ‍ॅपशी संबंधित एक सर्व्हर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यात राज कुंद्रा याच्या सर्व अ‍ॅपची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागणार आहे. तसेच याप्रकरणी अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस यातील पीडितांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार आहेत.

मॉडेल गेहाना वशिष्ठ याचप्रकरणी गहनालासुद्धा अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यात गहनाची जामिनावर सुटका झाली. पॉर्न आणि बोल्ड व्हिडीओ यांच्यामध्ये फरक असल्याची प्रतिक्रिया गहनाने राज कुंद्राच्या अटकेनंतर दिली आहे. राज कुंद्रा आणि आपल्याला एकाच गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

या आमच्या दोघांकडे एकाच प्रकारचा तपास सुरू आहे. राज कुंद्रा याच्या कंपनीच्या माध्यमातून काय निर्मिती केली जात होती, याची मला कल्पना आहे. मी या अ‍ॅपसाठी तीन फिल्ममध्ये काम केले आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला नाही. तसेच मला केलेल्या कामाचा मोबदलासुद्धा मिळाला, असे तिने सांगितले.

कुंद्राच्या बँक खात्यात रोज लाखो रुपये

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राज कुंद्रा यांचे काही बँक डिटेल्स हाती लागले असून त्याच्या खात्यात रोज लाखो रुपयांचे डिपॉझिट होत असल्याचे उघडकीस आले आहे.

त्याच्या बँक डिटेल्सनुसार राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी दिवसाला 1 ते 10 लाख रुपये कमवत होते. ही रोजची आकडेवारी थक्क करणारी आहे.

वेबसीरिजच्या मॉडेलचा राज कुंद्रावर गंभीर आरोप

या मॉडेलने राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. एका व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलवर माझ्याकडे वेब सीरिजमध्ये काम कऱण्यासाठी न्यूड ऑडिशनची मागणी करण्यात आली होती, असाही आरोप या मॉडेलने केला आहे. या कॉलवर उमेश नावाची व्यक्ती होती, तसेच राज कुंद्राही होता. या सर्वांनी माझ्याशी अश्लील भाषेत संवाद साधला.

राज कुंद्राने त्याचा चेहरा मास्कने झाकला होता, पण मी त्याला ओळखले, असंही या मॉडेलने सांगितले आहे. मी आत्तापर्यंत यासंदर्भात कुठे काहीही वाच्यता केली नव्हती. मात्र मुंबई पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावले तर मी नक्की मदत करणार
आहे, असे या मॉडेलने सांगितले आहे.

नवोदित मॉडेल्स कुंद्राच्या टार्गेटवर!

राज कुंद्राला अटक करण्यापूर्वी गुन्हे शाखेने पाच महिने या प्रकरणाचा कसून तपास केला. तीन दिवसांपूर्वी मालाड पश्चिमच्या मड गावात एका भाड्याच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला आणि तेथून ठोस पुरावे मिळाल्यानंतरच राज कुंद्राला अटक करण्यात आली. 20 वर्षीय स्ट्रगलिंग मॉडेलला टार्गेट करून तिला कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवले जायचे आणि नंतर बळजबरीने तिला चित्रपटात काम करण्यास भाग पाडण्यात आल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.

या प्रकरणात 4 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेने अश्लील चित्रपटाशी संबंधित पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दोन, लोणावळ्यात एक आणि मालवणी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले. आजवर 11 जणांना यात अटक झाली आहे. राज कुंद्राच या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असून त्याचा मोबाईलही पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

कुंद्रा चित्रपट निर्मितीसाठी प्रॉडक्शन हाऊसच्या नावाखाली एक मोठे अश्लील फिल्म रॅकेट चालवत असे. त्याच्या चित्रपटांमध्ये काम करणार्‍या बहुतेक मुली आणि मुले स्ट्रगलिंग करणारे अभिनेता आणि अभिनेत्री होते.

पॉर्न चित्रपटांसाठी 20 ते 25 वर्षे वयोगटातील कलाकारांची निवड केली जात असे. शूटिंगपूर्वी त्यांची करारावर सही घेतली जायची, ज्यामध्ये स्वत:च्या इच्छेनुसार चित्रपट सोडल्याचा गुन्हा दाखल करण्याचा क्लॉज होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंद्रा एका कलाकाराला दिवसाला 30 ते 50 हजार रुपये देत असे.

मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात एका स्ट्रगलिंग मॉडेलने सांगितले की, चित्रपटांमध्ये बहुतेक मुली मुंबईबाहेरील आहेत. सुरुवातीला काही दिवस सामान्य शूट होत असे आणि त्यानंतर बोल्ड दृश्यांसाठी दबाव निर्माण केला जात असे. नकार दिल्यास कॉन्ट्रॅक्ट दाखवत त्यांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली जात असे. चित्रीकरण अर्धवट सोडल्यास किंवा करारातील नियमांचे पालन न केल्यास 10 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद होती.

Back to top button