वैद्यकीय अध्यापकांच्या जबरदस्ती बदल्या | पुढारी

वैद्यकीय अध्यापकांच्या जबरदस्ती बदल्या

मुंबई ; तन्मय शिंदे : राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जुन्या आणि बड्या महाविद्यालयातील अध्यापकांच्या बदल्या आणि बढती करण्यात आली आहे. मात्र प्राध्यापकांची अपुरी संख्या, अस्थायी कर्मचार्‍यांचा कायम करण्याचा प्रश्न ,भरती प्रक्रियेसाठी होणारा विलंब यामुळे सध्या मोठ्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची संख्या कमी आहे. एकीकडे अशी परिस्थिती असतान दुसरीकडे महाविद्यालय प्रशासन त्यांना नव्या जागी पाठविण्यास तयार नाही.

तसेच नव्या जागी अध्यापकांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने अध्यापक देखील बदलीच्या ठिकाणी जाण्यास उत्सुक नाहीत. मात्र तरी देखील शासनाकडून दडपशाही पद्धतीने अध्यापक डॉक्टरांची बदली सुरू असून याविरोधात प्राध्यापकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

विविध शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात तसेच नवनिर्मित शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात भारतीय वैद्यक आयोगाचे निरिक्षण होणार आहे. त्यामुळे संबंधित शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील भारतीय वैद्यक आयोगाच्या मानांकांची पुर्तता होण्यासाठी धडपड सुरू आहे.

संचलनालयामार्फत संबंधित शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील विविध अध्यापकांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शासनस्तरावरून बदल्या करण्यात येत आहेत.तसेच विविध विषयातील अध्यापकांना अस्थापना मंडळामार्फत शासनाने पदोन्नतीचे आदेश दिले आहेत.

शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील बदली-बढती देण्यात आलेल्या आध्यापकांना कार्यालय प्रमुख कार्यमुक्त करत नाहीत. त्यामुळे पदस्थापना देण्यात आलेल्या शासकिय महाविद्यालयातील मानांकनाची पुर्तता होत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कायालयप्रमुखांनी बदली- बढती झालेल्या ठिकाणी न पाठवल्यास संचलनालयाकडून कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.

* सध्या शासनाची 19 महाविद्यालये आहेत. त्यात सुमारे 4500 अध्यापकांची आवश्यकता आहे. मात्र सध्या केवळ 3200 अध्यापक येथे कार्यरत आहेत. त्यातही 500 हे अस्थायी स्वरूपातील आहेत.

* जेजे रुग्णालयातून 48 प्राध्यापक अलिबाग येथे सुरू करण्यात आलेल्या महाविद्यालयासाठी मागविण्यात आले आहेत. बीजे मेडिकल पुणे येथील 40 बारामतीला, धुळ्याच्या शासकिय महाविद्यालयातील 30 जण नंदुरबार येथे पाठविण्यात आले आहेत.

* या बदल्यांमुळे जेजे, बिजेमेडिकल आणि धुळ्यातील शासकिय महाविद्यालयांना अडचणी भेडसवणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे डॉ सचिन मुलकुटकर यांनी सांगितले. सध्याच प्राध्यापकांचा तुटवडा 40 टक्के आहे आणखी 2 प्रस्थावित महाविद्यालये तयार झाल्यानंतर हा तुटवडा आणखी वाढणार आहे.त्यामुळे तातडीने अस्थायी प्राध्यापकांना कायम करून नवीन प्राध्यापकांची भरतीची मागणी डॉ सचिन मुलकुटकर यांनी केली.

* सध्या बदली- बढती झालेल्या ठिकाणी राहण्यासाठी निवास स्थानाची सोय नाही ,नव्या जागी राहण्याची सोय नसल्याने तेथे जाण्यासाठीचा शासनाकडून प्रवास खर्च मिळणे अपेक्षित होते मात्र खर्च देण्यासही शासन तयार नाही. तेथे जेवणाचीही सोय नाही. त्यामुळे शासनाने या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी बदली करण्यात आलेल्या वैद्यकिय प्राध्यापकांकडून संतप्तपणे करण्यात येत आहे.

जेजेतील 48 अध्यापकांची बदली

सध्या अलिबागचे येथे प्रथम वर्षासाठीचे महाविद्यालय सुरू होणार आहे, मात्र त्याआधीच 48 अध्यापकांना जेजेतून अलिबाग या ठिकाणी बदली-बढती प्रक्रियेतून ह्जर होण्यास सांगण्यात आले आहे. मात्र त्यामुळे जेजे सारख्या बड्या महाविद्यालय/रुग्णालयावर ताण वाढणार असल्याने या अध्यापकांना सोडण्यास प्रशासन तयार होत नाही. सिंधुदुर्ग या ठिकाणी तर काही महिन्यांपुर्वी भारतीय वैद्यक आयोगाकडून करण्यात आलेल्या तपासणीत तेथे अध्यापक नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे तेंव्हा पासून अध्यापकांच्या बदल्या करण्यापेक्षा भरती करा अशी मागणी जोर धरू लागली.

Back to top button