School Student Death : विहानचा क्रिकेटचा तास ठरला अखेरचा!

शाळेच्या बसवर मंगळवारी दुपारी मोठे पिंपळाचे झाड कोसळल्याने ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा दुर्दैवी मृत्यू
School Student Death
विहान श्रीवास्तवpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : चेंबूरमधील घाटला गाव परिसरात कुकरेजा रेसिडेन्सी येथे राहणारा ११ वर्षीय विहान श्रीवास्तव मंगळवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. युनिव्हर्सल स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विहानचा मंगळवारी क्रिकेटचा तास होता. क्रिकेटची आवड असलेल्या विहानने मोठ्या उत्साहात मित्रांसोबत मैदानावर खेळ केला. मात्र, काही तासांनंतर घरी जाताना स्कूलबसमध्ये त्याच्यावर काळाने झडप घातली.

विहान शांत आणि निरागस स्वभावाचा होता. तो फारसा बोलत नसे; पण सर्वांना आवडणारा विद्यार्थी होता, तो काही वेळापूर्वीच आमच्यासोबत क्रिकेट खेळत होता. आता तो आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही, अशा शब्दांत क्रिकेट प्रशिक्षक धनश्री राव-राणे यांनी भावना व्यक्त केल्या.

चेंबूरमधील शाळेच्या बसवर मंगळवारी दुपारी मोठे पिंपळाचे झाड कोसळल्याने ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे चेंबूरमधील कुक्रेजा रेसिडेन्सी परिसरात शोककळा पसरली असून विहानच्या निधनाने कुटुंबीय, मित्र आणि शेजारी हळहळ व्यक्त करत आहेत.

School Student Death
Ketan Agarwal: लोहगड मृत्यू प्रकरणाला नवे वळण; केतन अग्रवाल प्रकरणात संशय वाढला

युनिव्हर्सल हायस्कूलमध्ये सहावीत शिकणारा विहान हा शाळेच्या बसमधील १२ विद्यार्थ्यांपैकी एक होता. रोड क्रमांक ११ वरील हेरिटेज प्राइड इमारतीजवळ एका विद्यार्थ्याला सोडण्यासाठी बस थांबली असताना अचानक मोठे झाड उन्मळून बसवर कोसळले. या दुर्घटनेत पाच विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी ४.२३ वाजता डॉक्टरांनी विहानला मृत घोषित केले. इतर चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या असून युवान गेहलानी या विद्यार्थ्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तसेच बसमध्ये अडकलेल्या गनीव आणि मानिका सिंग या भावंडांवरही किरकोळ दुखापतींसाठी उपचार सुरू आहेत.

विहानच्या निधनाने त्याच्या शेजाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. स्थानिक आमदार तुकाराम काते यांनी विहानच्या आठवणींना उजाळा दिला. तो अत्यंत चंचल आणि बोलका मुलगा होता. जवळपास दररोज माझ्या घरी नातू हर्षवर्धनसोबत खेळण्यासाठी यायचा. आमच्या सोसायटीतील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक त्याला ओळखत होता आणि त्याच्याशी गप्पा मारायला आवडत असे,असे काते म्हणाले.

युनिव्हर्सल हायस्कूलच्या शिक्षिका आणि शाळा प्रभारी दर्शिका मेहता म्हणाल्या विहान अत्यंत हुशार, निरागस. शाळेच्या क्रीडा संघाचाही तो सदस्य होता. त्याच्यासमोर उज्ज्वल भविष्य होते. या मुलांसोबत अशी दुर्दैवी घटना घडणे अत्यंत वेदनादायी आहे,असे त्या म्हणाल्या. या घटनेने शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना मोठा धक्का बसला आहे.

विहान आपल्या आई जुई आणि वडील गौरव श्रीवास्तव यांच्यासोबत चेंबूरमध्ये राहत होता. दोघेही नोकरदार आहेत. विहानच्या आईच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी सुमारे चारच्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच त्या तातडीने रुग्णालयात धावल्या.

या दुर्घटनेतून बचावलेल्या विद्यार्थ्यांवर मात्र मानसिक आघात झाला आहे. आठवीत शिकणारी कृषा रॉय हिने, मोठा आवाज आला आणि झाड बसवर कोसळले. आम्ही बसमध्ये अडकलो होतो. परिसरातील लोकांनी आम्हाला बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले, अशी माहिती दिली. तिच्या मनगटाला किरकोळ दुखापत झाली असून उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले.

School Student Death
Shirdi Fraud Case | नाशिकच्या भोंदूबाबाचे 'ईडी' कनेक्शन! प्रतिभा चाकणकरांची चौकशी; 2 कोटींच्या संशयास्पद व्यवहारांचा पेच

सातवीतील अथर्व याला शारीरिक दुखापत झाली नसली तरी तो अद्याप धक्क्यात आहे. त्याचे वडील अजित बरकडे यांनी सांगितले की, विहानच्या मृत्यूची माहिती अद्याप अथर्वला देण्यात आलेली नाही, कारण त्यामुळे त्याला आणखी मानसिक धक्का बसण्याची भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news