टिपू सुलतानच्या नावावरून धुमश्‍चक्री | पुढारी

टिपू सुलतानच्या नावावरून धुमश्‍चक्री

मुंबई ः

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली असतानाच आता टिपू सुलतानच्या नावावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात धुमश्चक्री सुरु झाली आहे. टिपू सुलतानच्या नावाला विरोध करून भाजपचा राज्यात धार्मिक विद्वेष पसरवून दंगली घडविण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर भाजपने टिपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी करीत आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील राजकीय लढाईला तोंड फुटले आहे.

मुंबईतील मालाड मालवणी भागातील एका क्रीडा संकुलाला ‘वीर टिपू सुलतान क्रीडांगण’ असे नाव देण्यावरून राजकीय वाद चिघळला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या नावाला विरोध करत निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो देशगौरव होऊ शकत नाही. त्याचे नाव मैदानाला देणे सर्वथा गैर आहे. आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख हे त्या उद्यानाचे नामकरण करायला गेले नाहीत. उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे, त्याचे ते उद्घाटन करणार आहेत. त्या उद्यानाला टिपू सुलतान हे नाव पूर्वीपासून आहे. भाजप विनाकारण धार्मिक रंग देत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, टिपू सुलतान यांच्याविषयी चुकीचे बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा. इतकेच नाहीतर राष्ट्रपती भवनमध्ये ठिय्या आंदोलन करा, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी भाजपला दिला.

Back to top button