शिल्पा शेट्टी चीही होणार चौकशी? राज कुंद्राच्या अडचणीत वाढ

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : लंडनच्या ‘हॉटशॉट’ अॅपला पोर्न फिल्म तयार करून विकल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध उद्योजक आणि सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी चा पती राज कुंद्रा याला वांद्रे न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. कुंद्राच्या अनेक व्यवसायांमध्ये भागीदार असल्यामुळे आता शिल्पा शेट्टी चीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वेबसीरिजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले जात होते. त्यांच्या अश्लील चित्रफिती बनवून त्या वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याचा कुंद्रावर आरोप आहे. याच गुन्ह्यात मुंबईच्या गुन्हे शाखेने त्याला सोमवारी रात्री अटक केली.
पोर्न फिल्मनिर्मिती आणि या फिल्म प्रसारित करण्याच्या व्यवसायात राज कुंद्रा हा मुख्य सूत्रधार आहे.
आधीच अटकेत असलेल्या अन्य आरोपींसोबत त्याची चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
गुन्हे शाखेने रियान थॉर्प याच्यासह कुंद्राला अटक केली होती. त्यालाही न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
यात पोलिस शिल्पा शेट्टी हिचीदेखील चौकशी करू शकतात.
कारण, कुंद्राच्या अनेक व्यवसायांमध्ये ती पती राज कुंद्राची पार्टनर आहे.
मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा लवकरच शिल्पा शेट्टीला चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजावू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
मढ आयलँडच्या बंगल्यावर छापा
कुंद्राला पोर्नोग्राफीप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा अटक केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी मढ आयलँडवरील ‘ग्रीन व्हिला’ या बंगल्यावर छापा टाकला. पोर्न फिल्मचे शूटिंग याच ठिकाणी चालत असावे.
गेल्या फेब्रुवारीमध्ये मढच्या या बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात अश्लील चित्रपट बनविणार्या टोळीला अटक करण्यात आली होती.
याच प्रकरणात कुंद्रा प्रमुख संशयित आहे.
त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याने अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.