ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : लोकल रुळांच्या बाजूला राहणार्या रहिवाशांना बेघर केल्यास लढा उभारण्याचा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी दिला. तीन तास रेल्वे रोखली तर देशातील रेल्वे वाहतूक ठप्प होईल, हे ध्यानात ठेवा, असा आक्रमक पवित्रा आव्हाड यांनी घेतला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे रुळांलगतच्या झोपड्या सात दिवसांत रिकाम्या करण्याच्या नोटिसा रेल्वेने बजावल्या आहेत. या कारवाईत सुमारे पाच लाख लोक बाधित होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण आनंदवाडी भागातील झोपडपट्टीला भेट दिल्यानंतर आव्हाड बोलत होते. कळव्यातील 35 हजार झोपडीधारकांच्या घरांवर जेव्हा असेच संकट आले तेव्हा मी पहाटेपासून तीन तास रेल्वे रोखून धरली होती आणि केंद्र सरकारला आपला निर्णय फिरवण्यास भाग पाडले होते याची आठवणही आव्हाड यांनी करून दिली.
एवढ्या लोकांना घराबाहेर काढण्यासाठी मिलिट्रीला बोलवावे लागेल. हे सर्व गोरगरीब लोकांना घाबरवण्यासाठीच करण्यात आले आहे, असे आव्हाड म्हणाले.
चार पिढ्या जिथे वाढल्या; त्या घरातून अचानक बेदखल करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. प्रसंगी रक्त सांडण्याची तयारी ठेवा. मी स्वतः झोपडीधारकांची घरे वाचविण्यासाठी लढा देणार आहे. कारण, हा माझा लढा आहे, असे सांगत जितेंद्र आव्हाड म्हणाले, केंद्राने एसआरएचा कायदा स्वीकारावा; राज्य सरकार केंद्राच्या भूखंडावरील झोपडीधारकांना हक्काची घरे देईल, असेही आव्हाड यांनी सांगितले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, आ. जगन्नाथ शिंदे, सुधीर पाटील आदी उपस्थित होते.