

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईच्या फोर्ट परिसरातील व्यावसायिकाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात अखेर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गँगस्टर सुरेश पुजारी याला अटक केली आहे. याप्रकरणातील ही सातवी अटक असून गुन्हे शाखेने यापूर्वी सुरेश पुजारी टोळीच्या दोन हस्तकासह तीन शुटर्स आणि एका अल्पवयिन आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. (Gangstar Suresh Pujari)
गुन्हेशाखेने याप्रकरणात मोक्का कायद्यान्वये कारवाई करत विशेष मोक्का न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात सुरेश पुजारी याला पाहीजे आरोपी दाखविण्यात आले होते. अखेर खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या पथकाने सुरेश पुजारी याचा ताबा घेत त्याला या गुन्ह्यात अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले.
गँगस्टर सुरेश पुजारी याच्या विरोधात मुंबईसह ठाणे, मिरा-भाईंदर आणि नवी मुंबई अशा ठिकाणी एकूण 51 गुन्हे दाखल आहेत. यातील 17 गुन्हे मुंबई पोलिसांकडे दाखल असून 10 गुन्ह्यांचा तपास गुन्हेशाखा करत आहे. यात मोक्का कायद्यान्वये 06, खुनाच्या प्रयत्नाचे 03 आणि खंडणीच्या 04 गुन्ह्यांचा समावेश आहे. तर, ठाणे पोलिसांकडे 30, राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे दोन, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर पोलिसांकडे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.
उल्हासनगर परिसरात कुटूंबासोबत राहात असलेल्या व्यावसायिकाचे फोर्ट परिसरात महागडे कॅमेरे विकण्याचे दुकान आहे. त्याच्या या व्यवसायावर नजर पडलेल्या सुरेश पुजारी टोळीने 6 जानेवारी ते 19 जानेवारी 2018 या काळात 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावले होते.
विदेशातून थेट सुरेश पुजारीचा खंडणीसाठी फोन येऊनसुद्धा हा व्यावसायिक घाबरत नव्हता. अशाप्रकारेच खंडणी न देणार्या ठाण्याच्या भिवंडी परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाच्या हॉटेलवर 10 जानेवारी 2018 च्या दुपारी पुजारीने तीन शुटर्सच्या मदतीने गोळीबार घडवून आणला. गोळीबारात हॉटेलमध्ये रिसेप्शनीस्ट स्वरा शिरसाट (25) ही गंभीर जखमी झाली होती.
ठाण्यातील गोळीबाराचे वृत्त प्रसिद्धी माध्यमांवर झळकू लागल्यानंतर पुजारीने फोर्टमधील व्यावसायिकाला अशाप्रकारेच गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देत रक्कम वाढवून 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी सुरू केली. तूला ठार मारुन तुझ्या मुलाकडून खंडणी वसूल करेन अशी धमकी पुजारीने दिल्याने घाबरलेल्या व्यावसायिकाने मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखेकडे धाव घेतली.
त्यानंतर याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका अल्पवयीनासह एकूण सहा आरोपींना अटक करत त्यांच्याजवळून दोन पिस्तूल, तीन मॅगझीन आणि पाच जीवंत काडतुसे हस्तगत केली होती.