Dombivali: खड्ड्यात पडून १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू | पुढारी

Dombivali: खड्ड्यात पडून १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू

डोंबिवली – पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली (Dombivali) येथील सागाव परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टसाठी खाेदलेल्‍या खड्ड्यात पडून एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Dombivali: लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात मुलाचा मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली(Dombivali) पूर्वेकडील सागाव परिसरात राहणारे मुलाचे वडील भंगारच्या दुकानात काम करतात. पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे. मंगळवारी सांयकाळी त्यांचा १० वर्षाचा मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला होता. जवळपास दोन तास मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. तासभर शोध घेऊनही तो सापडला नाही. मुलाच्या आई-वडिलांनी आसपासच्या इमारतींमध्ये जाऊन मुलाचा शोध घेतला. एका इमारतीच्या लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते; या पाण्यात मुलाचा मृतदेह आढळून आला.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून निष्काळजीपणा करणाऱ्या विरुद्ध ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे. तसेच लिफ्टचे काम सुरु होते तर योग्य ती खबरदारी का घेतली गेली नाही, असा प्रश्न विचारण्यात येत असून, तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

हेही वाचा

Back to top button