मुंबई जवळ युद्धनौकेवर स्फोट; 3 जवान शहीद | पुढारी

मुंबई जवळ युद्धनौकेवर स्फोट; 3 जवान शहीद

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई च्या सागरी क्षेत्रात तैनात असलेल्या ‘आयएनएस रणवीर’वर झालेल्या भीषण स्फोटात नौदलाचे तीन जवान शहीद झाले आहेत. याशिवाय युद्धनौकेवरील 11 जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती संरक्षण दलाने दिली.

जखमी जवानांवर ‘आयएनएस अश्‍विनी’वर असलेल्या नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. युद्धनौकेवर स्फोट झाल्यानंतर जहाजावरील कर्मचार्‍यांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे युद्धनौकेची संभाव्य मोठी हानी टाळण्यात यश आले आहे.

‘आयएनएस रणवीर’ पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते. लवकरच ही युद्धनौका बंदरावर परतणार होती. मात्र, त्यापूर्वीच युद्धनौकेच्या एका कम्पार्टमेंटमध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट कशाचा याचा शोध घेतला जात असून, त्यासाठी चौकशी समिती नेमल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे.

21 एप्रिल 1986 रोजी हे जहाज भारतीय नौदलात दाखल झाले. ‘रणवीर’वर्गाच्या जहाजांमध्ये पाणबुडी, कमी उडणारी विमाने आणि क्रूझ क्षेपणास्त्ररोधक, विमानविरोधी आणि पाणबुडीविरोधी संरक्षणाचा समावेश होतो.

Back to top button