

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या महामारीत मुंबई महापालिकेने केलेले ऑक्सिजन पुरवठ्याचे व्यवस्थापन सुप्रीम कोर्टासह देशभरात कौतुकाचे धनी ठरले असताना मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मात्र ऑक्सिजन पुरवठ्याचे कंत्राट देण्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तब्बल 320 कोटींची कंत्राटे देताना कंत्राटदार आणि पालिकेचे अभियंते यांच्यात 'मॅचफिक्सिंग' झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना खास पत्र लिहून वादग्रस्त ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीची दक्षता विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे 84 कोटींचे काम देण्यात आले होते. राणीबागेतील पेग्विंन प्रकल्पात निकृष्ट काम केल्यामुळे या कंपनीला दंड झाला होता.
शिवाय जयपूरच्या सवाई मानसिंग वैद्यकीय महाविद्यालयानेही या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. याकडे लक्ष वेधून अस्लम शेख म्हणतात, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आधीच्या कंत्राटातील 16 ऑक्सिजन प्रकल्प अजूनही पूर्ण झालेले नसताना याच कंपनीला नवे कंत्राट द्यायला नको.
परंतु आता मुंबईत ऑक्सिजन प्रकल्पांच्या उभारणीसाठी 320 कोटींचे टेंडर नव्याने काढण्यात आले. फक्त दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या. त्यात एक निविदा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचीच निघाली.
आधीची कंत्राटेही याच कंपनीला तीदेखील एकच निविदा आली असताना देण्यात आली. शिवाय अंदाजित खर्चापेक्षा जास्त खर्च या कंपनीने नोंदवूनही कंत्राट दिले गेले. याचा अर्थ पालिकेच्या अभियंत्यांशी या कंपनीचे साटेलोटे आहे.
मुंबईत 12 ठिकाणी 16 ऑक्सिजन प्रकल्प 30 दिवसांत उभारण्यासाठी एप्रिलमध्ये टेंडर मागवण्यात आले होते. मात्र, भाजप नेते विनोद मिश्रा यांनी कंत्राटदार कंपनीला आक्षेप घेतल्यानंतर हे ऑक्सिजन प्रकल्प रखडले.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरसू यांनी मात्र अस्लम शेख यांचे आरोप फेटाळले. ते म्हणाले, ऑक्सिजन प्रकल्पासाठी इलेक्ट्रॉनिक आणि तेही खुले टेंडर मागवले होते. सर्वांसाठी ते खुले होते. त्यासाठीची मुदत वाढवून दिल्यानंतरही फक्त दोन निविदा आल्या. आता हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला निविदेतील अटींनुसार ऑक्सिजन प्रकल्प बसवावे लागतील. अन्यथा, कारवाई केली जाईल.