अभिनेता किरण माने यांनी घेतली शरद पवार यांची भेट | पुढारी

अभिनेता किरण माने यांनी घेतली शरद पवार यांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्कच;  एका राजकीय पोस्टमुळे सातार्‍याचे प्रसिध्द अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याने याचे पडसाद सोशल मीडिया उमटत आहेत. त्यांच्या पाठिंब्यासाठी सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला. याच दरम्यान, किरण माने यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत सातार्‍याचे अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र लोकप्रिय झाले. अभिनेता किरण हे त्यांच्या फेसबूक पेजवरुन अनेक विषयांवर बेधडकपणे भाष्य करत असतात. त्यातच त्यांची एक राजकीय पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे माने यांना संबंधित मालिकेतून वगळण्यात आले.

याबाबतचे वृत्त सातारा शहरासह जिल्ह्यात पसरताच किरण माने यांच्या भूमिकेला जोरदार पाठींबा दिला गेला. सोशल मीडियावर नेटकर्‍यांनी किरण माने यांची भूमिका चांगलीच उचलून धरली. सगळ्या प्रकाराविषयी जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. फेसबूक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्रामवरुन नेटकर्‍यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय व कला-मनोरंजन क्षेत्रातूनही किरण यांना पूरक अशी भूमिका घेण्यात आली.

कारवाईप्रश्नी बोलताना गुणी कलावंत किरण यांनी परखड मत व्यक्त केले आहे. शिवबा-तुकोबांच्या आणि शाहू-फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडलं आहे, हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रात अशी झुंडशाही खरं तर खपवून घेतली जाऊ नये. माझ्या उदाहरणामधून काय घडणार आहे, हे आपण पाहूयात.

यात जर मला न्याय मिळाला नाही तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोक याविरोधात बोलायला पुढे येतील, काय करायचंय हे लोकांनी ठरवावं. माझ्या सगळ्या पोस्ट्स वाचा, त्यामध्ये कुठेही जातीवादी विखार दिसणार नसल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे. त्यांच्या या मतावर सातार्‍यातून पाठिंब्याचा जोरदार हॅशटॅग ट्रेंड पहायला मिळाला. यानंतर किरण याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

हेही वाचलंत का?

Back to top button