मंत्र्यांच्या बंगल्यांना आता गड-किल्ल्यांची नावे! | पुढारी

मंत्र्यांच्या बंगल्यांना आता गड-किल्ल्यांची नावे!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व दुकाने, आस्थापनांना मराठी भाषेत नामफलक लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने मंत्र्यांच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार या बंगल्यांना आता राज्यातील गडकोटांची नावे दिली जाणार आहेत. त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्र्यांच्या बंगल्यांची नावे बदलण्याबाबतचा प्रस्ताव दिला होता. मात्र, या प्रस्तावावर कार्यवाही झाली नव्हती. राज्यातील सर्व दुकाने, आस्थापनांना मराठी भाषेतील पाट्या लावणे बंधनकारक केल्यानंतर दोन दिवसात राज्य सरकारने आपल्या अखत्यारित असलेल्या बंगल्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार आता शासकीय बंगल्यांची नावे बदलण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने पत्रक जारी केले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बंगल्यांना नावे दिली जाणार आहेत. त्यामुळे आजवर क्रमांकावरून ओळखल्या जाणार्‍या या बंगल्यांवर आता गडकोटांची नावे झळकणार आहेत.

मंत्रालयासमोर एका रांगेत काही मंत्र्यांचे बंगले आहेत. अ-3, अ-4 पासून क-7 अशी या बंगल्यांची नावे असली तरी प्रत्यक्षात ए-3, ए-4 अशीच नावे रूढ होती. आता मात्र या बंगल्यांना राज्याचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गड-किल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत.

मंत्री उदय सामंत यांनी मांडलेला प्रस्ताव मंजूर होताच आपल्या बंगल्याचे लागलीच नाव बदलले. सामंत यांचा बंगला ब- 2 किंवा बी-2 या नावाने ओळखला जाणार्‍या त्यांच्या शासकीय निवासस्थानाचे ‘रत्नसिंधू’ असे नामकरण करण्यात आले. रत्नसिंधू ही पाटीही लावण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच, अन्य बंगल्यांच्या नावांच्या पाट्याही बदलल्या जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button