राम कदम : “शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का?” | पुढारी

राम कदम : "शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का?"

मुंबई, पुढारी ऑनलाईन : एसटी कर्मचारी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी नुकतीच अधिकारी आणि कर्मचारी संघटनांसोबत परिवहनमंत्री अनिल परब व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. त्यावरून भाजपने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी यावर बैठकीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

भाजपचे आमदार राम कदम ट्विट करत म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्याकडे चार्ज दिला आहे का?. शरद पवार घटनाबाह्य आणि संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? शरद पवारांना बैठक घ्यायचीच असेल तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाही?”, असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

भीती न बाळगता कामावर हजर व्हावं : अनिल परब

“शरद पवारांच्या उपस्थिती २२ कर्मचारी संघटनांशी चर्चा करण्यात आली आहे. विलिनीकरणाबाबतचा अहवाल ३ आठवड्यांत न्यायालयात सादर केला जाईल. सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत विचार करुन निर्णय घेतला जाईल. कामावर परत येण्यासाठी कर्मचाऱ्यांना ३ दिवसांचा मुदत वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता कामावर हजर व्हावं”, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत सह्याद्री अतिथीग्रुह येथे एसटी कृती समितीची बैठक झाली होती. यात ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची किंवा बडतर्फी पर्यंतची कारवाई करण्यात आलेली नाही. अशा (सुमारे ५५ हजार कर्मचारी) कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे! त्यांच्यावर एसटी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. त्यानुसार कृती समितीमधील संघटनांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button