ITI Admission 2026 : दहावीत शंभर टक्के मिळवलेल्या २३ विद्यार्थ्यांचा आयटीआयला अर्ज

९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या ६७४ विद्यार्थ्यांची पसंती
ITI Admission 2026
ITI Admission 2026Pudhari
Published on
Updated on

मुंबई : दहावीत शंभर टक्के गुण मिळवलेल्या २३ विद्यार्थ्यांनी यंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी अर्ज केला असून त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग असल्याचे सर्वसाधारण गुणवत्ता यादीत स्पष्ट झाले आहे. याशिवाय ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या ६७४ विद्यार्थ्यांनीही आयटीआय अभ्यासक्रमांना पसंती दिली आहे. त्यामुळे दहावीनंतर केवळ कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचाच पर्याय म्हणून पाहिले जाणारे आयटीआय शिक्षण आता गुणवंत विद्यार्थ्यांचेही आकर्षण बनत असल्याचे चित्र दिसत आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली. या यादीनुसार राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी एकूण १ लाख ७० हजार ३९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये १ लाख ४२ हजार ५९२ मुले आणि २७ हजार ८०७ मुलींचा समावेश आहे. गेल्या वर्षी ही संख्या १ लाख ७३ हजार ६७३ इतकी होती. त्यामुळे यंदा पहिल्या फेरीअगोदर अर्ज केलेल्या संख्येत ३ हजार २७४ विद्यार्थ्यांची घट झाली आहे.

ITI Admission 2026
ITI Admission: आयटीआय प्रवेश पसंतिक्रम भरण्याचा आज अखेरचा दिवस

यंदाच्या यादीत, १०० टक्के गुण मिळवलेल्या २३ विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केला आहे. तसेच ९०.०१ ते ९५ टक्के गुण मिळवलेल्या ६११ विद्यार्थ्यांनी आणि ९५.०१ ते ९९.९९ टक्के गुण मिळवलेल्या ४० विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.

म्हणजेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६७४ इतकी आहे. याशिवाय ८५ ते २० टक्के गुण मिळवलेल्या ३ हजार ३२० आणि ८० ते ८५ टक्के गुण मिळवलेल्या ७ हजार ८९५ विद्यार्थ्यांनीही आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केला आहे.

दहावीमध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी म्हणून आयटीआयकडे पाहिले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. उद्योग क्षेत्रात कौशल्याधारित मनुष्यबळाची वाढती मागणी, अल्प कालावधीत प्रशिक्षण पूर्ण होण्याची सुविधा, प्रशिक्षणानंतर नोकरीच्या वाढलेल्या संधी आणि स्व-रोजगाराच्या उपलब्ध पर्यायांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचाही आयटीआयकडे कल वाढत आहे.

इलेक्ट्रिशियन, फिटर, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, मेकॅनिक मोटार व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, वेल्डर, टर्नर आदी लोकप्रिय ट्रेडमध्ये प्रवेशासाठी यंदाही मोठी स्पर्धा अपेक्षित आहे.

दरम्यान, प्रवर्गनिहाय आकडेवारीमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या प्रवर्गातील ४६ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यापाठोपाठ खुल्या प्रवर्गातील ३५ हजार १३९, अनुसूचित जाती प्रवर्गातील ३२ हजार ४७६, अनुसूचित जमाती प्रवर्गातील १८ हजार ९८, तर भटक्या आणि विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातील ६ हजार ६१ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत.

ITI Admission 2026
11th Admission: राज्यात अकरावीच्या १६ लाख जागा रिक्त! एकूण क्षमतेच्या तुलनेत केवळ २८.८८ टक्के जागांवर प्रवेश

आयटीआय प्रवेशाच्या फेऱ्यांचे वेळापत्रक

पहिली गुणवत्ता यादी जाहीर २ जुलै २०२६ पहिल्या फेरीत प्रवेश निश्चिती ३ ते ७ जुलै २०२६ दुसऱ्या फेरीसाठी पर्याय भरणे ३ ते ७ जुलै २०२६ दुसरी गुणवत्ता यादी १२ जुलै २०२६ दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चिती १३ ते १६ जुलै २०२६ तिसऱ्या फेरीसाठी पर्याय भरणे १३ ते १६ जुलै २०२६ तिसरी गुणवत्ता यादी २१ जुलै २०२६ तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चिती २२ ते २५ जुलै २०२६ चौथ्या फेरीसाठी पर्याय भरणे २२ ते २५ जुलै २०२६ चौथी गुणवत्ता यादी ३० जुलै २०२६ चौथ्या फेरीतील प्रवेश निश्चिती ३१ जुलै ते ४ ऑगस्ट २०२६ नव्याने नोंदणी व अर्ज निश्चिती ३ जुलै ते ४ ऑगस्ट २०२६ संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचे वेळापत्रक १ ऑगस्टपर्यंत जाहीर

  • दहावीत १०० टक्के गुण मिळवलेल्या २३ विद्यार्थ्यांच्या पसंतीतही पारंपरिक आणि रोजगाराभिमुख ट्रेडच आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. या २३ विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक सहा विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिशियन, तर पाच विद्यार्थ्यांनी फिटर या ट्रेडला पहिली पसंती दिली आहे. याशिवाय मेकॅनिक मोटार व्हेईकल या ट्रेडला चार, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) या ट्रेडला प्रत्येकी तीन, तर सोलार टेक्निशियन या ट्रेडला दोन विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती दिली आहे. हरित ऊर्जा, ऑटोमोबाईल आणि औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या रोजगार संधी लक्षात घेऊन गुणवंत विद्यार्थ्यांनीही या कौशल्याधारित ट्रेडची निवड केल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news