शंभर कोटी वसुली प्रकरणातील मध्यस्थाला ठाण्यातून अटक

शंभर कोटी वसुली प्रकरणातील मध्यस्थाला ठाण्यातून अटक

मुंबई/ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात संतोष जगताप या मध्यस्थाला सीबीआयने रविवारी ठाण्यातून अटक केली. त्याच्याकडून 9 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्याला 4 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. देशमुखांच्या काळात झालेल्या बदल्या आणि पोस्टिंगमध्ये जगताप मध्यस्थ म्हणून काम करत होता.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने प्राथमिक तपास करून गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने अनेकांकडे चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवले.

दरम्यानच्या काळात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड त्याचबरोबर संतोष जगताप यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. कैलास गायकवाड चौकशीला हजर राहिले. मात्र, संतोष जगताप हजर न राहिल्याने सीबीआयने त्याच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली त्यावेळी न्यायालयाने संतोष जगतापविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले. जगताप ठाण्यात येणार असल्याची कुणकुण सीबीआयला लागली होती. त्यानुसार सापळा रचून जगतापला अटक करण्यात आली.

याआधी सीबीआयचा गोपनीय अहवाल उघड केल्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांचे वकील आनंद डागा आणि एका सीबीआय अधिकार्‍याला अटक केली होती. अँटिलिया स्फोटके प्रकरणानंतर पोलीस अधिकार्‍यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या होत्या.त्यात परमबीर यांचीही बदली करण्यात आली. त्यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात आरोपानंतर देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासूनच केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे. यापूर्वी ईडीने 6 वेळा, सीबीआयने 3 वेळा तसेच प्राप्तिकर विभागाने एकदा देशमुख यांच्या घरी छापेमारी केली आहे.

परमबीर सिंग बेल्जियममध्ये

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे बेल्जियममध्ये आहेत असा दावा काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे. सोबतच, परमबीर सिंग बेल्जियममध्ये कसे गेले? त्यांना बेल्जियममध्ये सुरक्षितरित्या कुणी पाठवले? आता आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना भारतात आणू शकत नाही का? असे सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

सध्या काँग्रेस पक्षात फारसे सक्रिय नसलेले संजय निरूपम यांनी शनिवारी रात्री उशिरा एक ट्विट करत मुंबईचे वादग्रस्त माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग बेल्जियममध्ये असल्याचा आरोप केला. निरूपम यांनी एक फोटो ट्विट करत म्हटले आहे की,

हे आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त. यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर हप्तावसुलीचा आरोप केला होता. परमबीर सिंग सध्या पाच प्रकरणांमध्ये वाँटेड आहेत. पोलिसांनी म्हटले आहे की ते फरार आहेत. आता हे समजले आहे की ते बेल्जियममध्ये आहेत. परमबीर सिंग बेल्जियममध्ये कसे गेले? त्यांना बेल्जियममध्ये सेफली कुणी पाठवले? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना देशात आणू शकत नाही का?' असे सवाल करत संजय निरूपम यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. मात्र, गेली पाच-सहा महिन्यांपासून ते बेपत्ता आहेत. त्यामुळे ठाणे कोर्टानंतर आता मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news