पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार लसीकरणाचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार लसीकरणाचा आढावा

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 आणि सीओपी-26 या जागतिक परिषदांमध्ये भाग घेऊन भारतात परतल्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियानात मागे राहिलेल्या जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने रविवारी ही माहिती दिली.

3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. यात देशभरातील 40हून अधिक जिल्हाधिकारी सहभागी असणार आहेत. या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी बैठकीत सहभागी मुख्यमंत्र्यांकडून कोरोना स्थितीचा आढावाही घेणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या बैठकीत सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, बैठकीत पहिल्या आणि दुसर्‍या डोसचे प्रमाण कमी असल्याबाबत चर्चा होईल. या बैठकीत महाराष्ट्र, झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय या राज्यांसह लसीकरण कमी झालेल्या जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्या 40 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीत उपस्थित असतील त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीत उपस्थित राहतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोम, इटलीच्या दौर्‍यावर आहेत. ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या आग्रहावरून ते 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी ग्लासगो येथे सीओपी-26 या पर्यावरणविषयक शिखर परिषदेत उपस्थित राहतील.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांत कमी लसीकरण

महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी लसीकरण झाले आहे. हिंगोली, नांदेड, सोलापूर (19 टक्के), जळगाव, यवतमाळ, औरंगाबाद, यवतमाळ, बीड (20 ते 21.5 टक्के), उस्मानाबाद (22.7 टक्के), बुलडाणा (23.4 टक्के), नंदुरबार (23.3 टक्के), गडचिरोली.

येथे लसीकरणात आघाडी

मुंबई, पुणे, भंडारा, कोल्हापूर लसीकरणात आघाडीवर असून उर्वरित जिल्ह्यांतही समाधानकारक लसीकरण झालेले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news