

Mumbai Pune Expressway Missing Link Project Completion Date
मुंबई : मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाला चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सप्टेंबरपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार अशी चर्चा असतानाच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी डेडलाईनबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. मिसिंग लिंकच्या मार्गावरील व्हर्टिकल ब्रिजचे काम सुरू असून हे काम अवघड आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
30 मे रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) सुरू असलेल्या राज्यभरातील कामाचा आढावा घेतला. याबैठकीत मिसिंग प्रकल्पाची माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हर्टिकल ब्रिजचे काम सुरू आहे. हे काम नियोजनबद्धतीने करणे गरजेचे असते. पावसाळ्यात लोणावळासारख्या भागात पुलाचे काम करणे कठीण असल्याने आता हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिसिंग लिंक प्रकल्पाला आत्तापर्यंत किती वेळा मुदतवाढ मिळाली?
मिसिंग लिंक प्रकल्प हा आधी मार्च 2024, मग जानेवारी 2025 आणि मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, तिन्ही वेळा प्रकल्पाला मुदतावाढ देण्यात आली होती. एप्रिलमध्येही एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले होते. एकूण चार वेळा प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पासाठी खर्च किती?
मिसिंग लिंक प्रकल्पासाठी सुमारे 6,600 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून या प्रकल्पामुळे मुंबई- पुणे अंतर हे 6 किमीने कमी होऊन 19 किलोमीटरवरुन 13.3 किलोमीटरवर येणार आहे. या प्रकल्पामुळे किमान 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे
एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांमुळे यात भर पडते. यासाठीच एमएसआरडीसीने मिसिंग लिंकचा प्रकल्प हाती घेतला.
मिसिंग लिंक प्रकल्प हा खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या भागाला जोडणार आहे. या मार्गावर 1.6 किमी आणि 8.9 किमीचे दोन बोगदे आहेत. तर 180 मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आणि सर्वात रुंद बोगदा असेल, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली.