लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; शेतकर्‍यांत नवचैतन्य संचारले

लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; शेतकर्‍यांत नवचैतन्य संचारले
Published on
Updated on

लातूर, पुढारी वृत्तसेवा : शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोमवारी (दि.20) जोरदार पाऊस पडला. या पावसाने शेतकर्‍यांत चैतन्य संचारले असून चाड्यावरची मूठ आता सुटणार आहे.

शेतकर्‍यांनी मृग नक्षत्रात पेरणी होईल या आशेने पेरणीची तयारी वेळेत केली होती. जून सरत आला तरी पाऊस बरसत नसल्याने बळीराजा काळजीत पडला होता. सोमवारी वरुणराजाने मौन सोडले आणि अनेक ठिकाणी तो मनसोक्त बरसला. लातूर शहरात सायंकाळपासूनच त्याने हजेरी लावली होती. प्रारंभी कमी असलेला त्याचा जोर उत्तरोत्तर वाढतच गेला. दमदार सरी बसरल्याने रानांत पेरणीयोग्य ओलावा होण्यास अनुकूलता लाभली आहे. हलक्या रानावरच्या पेरण्या गतीने होतील. तसेच चांगल्या रानाबाबतही शेतकरी पेरणीचा निर्णय घेतील.

जिल्ह्यात लातूरसारखेच चित्र कमी अधिक प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी दिसून आले. रेणापूर, अहमदपूर, चाकूर शहर व तालुक्यात सायंकाळी हलक्या सरी बरसल्या. उदगीरमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू होता. जळकोटवर ढग दाटून आले होते. किनगावमध्ये सरी बरसल्या होत्या. निलंगा, औशातही काहीसे असेच चित्र होते. आकाश ढगांनी गच्च झाल्याने मोठ्या पावसाचा अंदाज नागरिक वर्तवत होते. एकंदरीत या पावसाने शेतकर्‍याच्या चेहर्‍यावर काहीसे समाधान फुलवले आहे. पावसाचा मुक्काम असाच राहिल्यास तो संततधार बरसल्यास पेरणी आटोपण्यात उशीर लागणार नाही.

दरम्यान, बियाणे, खते शेतकर्‍यांनी घेतली असून डीएसीसारख्या खतासाठी शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकरवी मोठी अडवणूक होत आहे. लिंकींग पध्दतीने अनावश्यक असलेल्या कृषी निविष्ठा शेतकर् यांच्या माथी मारल्या जात आहेत. अशावेळी कृषी विभागाची पथके कुठे आहेत? असा प्रश्नही गावकर्‍यांतून चर्चिला जात आहे. वेळेत पेरणी झाली व त्याला खताच्या मात्रेची जोड मिळाली तर पिकांची उगवण व वाढ चांगली होते. हा पूर्वानुभव असल्याने खतासाठी बिचार्‍या शेतकर्‍याला तडजोडी कराव्या लागत आहेत. सर्वात अडवणूक होणारी जमात म्हणून सामान्य शेतकरी ओळखला जातो. त्याची प्रचितीही येत असल्याचे चित्रही बाजारात दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news