बीड : धारूर येथे तळ्यात बैलगाडी कोसळून आजोबासह नातवाचा मृत्यू

file photo
file photo

धारूर, पुढारी वृत्तसेवा : रानडुकराने हल्ला केल्याने बैलजोडी उधळून गाडी तलावात जाऊन कोसळल्याने आजोबासह नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेत एक बैलही दगावला. मात्र, सुदैवाने एका बैलावर बसून आल्याने दुसरा नातू बालंबाल बचावला. ही घटना गुरूवारी (दि.२२) दुपारी धारूर तालुक्यातील कासारी (बोडखा) परिसरात घडली.

कबीर बाशुमिया सय्यद (७०), नातू अजमत अखिल सय्यद (१० रा. कासारी, बोडखा, ता. धारुर ) अशी मृतांची नावे आहेत, तर आतिक अखिल सय्यद (१२) हा बचावला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार कबीर सय्यद हे आपल्या दोन नातवांसोबत गुरूवारी (दि. २२) दुपारी बैलगाडीतून शेतात जात होते. शिवारातील बालाघाट डोंगरात असलेल्या वाघदरा तलावाच्या काठावरून जात असताना अचानक रानडुकरांनी बैलांवर हल्ला केला. यामुळे बैल उधळले.त्यामुळे बैलगाडी तलावात कोसळली. त्यानंतर बैलांनी जवळपास ५० फूट अंतरापर्यंत पाण्यातून 'बैलगाडी ओढत नेली. या दुर्घटनेनंतर आतिक एका बैलाच्या पाठीवर बसून तलावाबाहेर आला. घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिस, गुराखी मोतीराम उघडे याच्यासह अनेक शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी दोघांनाही तलावाबाहेर काढून भोगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी दोघांचे शवविच्छेदन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news