परभणी : कंत्राटी नोकरभरती कारवाईच्या रडारवर

परभणी : कंत्राटी नोकरभरती कारवाईच्या रडारवर
Published on
Updated on

परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्टाफ नर्स व टेक्निशियन या कंत्राटी पद भरती प्रक्रियेत मोठा अनागोंदी कारभार आर्थिक गैरव्यवहारातून झाल्याचे उमेदवारांच्या तक्रारीनंतर उघड झाले आहे. याप्रकरणी औरंगाबाद येथील आरोग्य उपसंचालकांसह इतर सात जणांच्या नेमलेल्या समितीकडून जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.22) सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेपर्यंत जुन्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग कार्यालयात संबंधितांची कसुन चौकशी करण्यात आली असून यात अनेक संशयास्पद बाबी निष्पन्न झाल्याने हे भरती प्रकरण आता कारवाईच्या रडारवर आल्याचे बोलल्या जात आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदरील पदभरती न झाल्याचेही या चौकशीत निष्पन्न झाल्याची बाब समोर येत असल्याची माहिती समजते. स्टाफ नर्स या पदासाठी जीएनएम परीक्षेतील गुण व अनुभवानुसार प्रात्यक्षिक परीक्षेकरिता जास्तीत जास्त एकास पाच उमेदवार बोलावणे क्रमवार्य होते, पण असे न होता सर्वच उमेदवारांना बोलावण्यात आल्याने या परीक्षेत जीएनएममध्ये कमी गुण असलेल्यांकडून आर्थिक गैरव्यवहार करत पात्र केल्याचीही चर्चा उमेदवारांतून होत आहे.

या भरतीत जीएनएममध्ये कमी गुण असलेल्यांना प्रात्यक्षिकात एकूण 20 पैकी 15 च्या वर गुण आर्थिक हितसंबंधातून दिल्याचेही उघड झालेले आहे. एवढेच नव्हे तर काहीजणांना 19 गुणही दिल्याची माहिती मिळाली. यातून हे उमेदवार अंतिम मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. यामुळे जीएनएममध्ये जास्तीचे गुण घेवूनही ते उमेदवार या प्रात्यक्षिकांत कमी गुण मिळाल्याने अपात्र ठरले होते. या सर्व पदभरतीसाठी नेमण्यात आलेल्या पदभरती समिती, कागदपत्रे छाननी समिती, कौशल्य चाचणी समिती, इतर ज्या काही समित्या कार्यरत करण्यात आल्या होत्या त्यांची सखोल चौकशी करणेबाबत उमेदवारांनी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी, आरोग्य संचालक, औरगांबाद येथील आरोग्य उपसंचालक यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी आंचल
गोयल यांच्या उपस्थितीत बुधवारी आरोग्य उपसंचालकांसह इतर सात जणांच्या समितीकडून संबंधित पदभरतीप्रकरणाची कसून चौकशी
करण्यात आली आहे. आता या चौकशी अहवालानंतर तत्कालीन जिल्हा कार्यक्रम समन्वयक व इतरांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भरती प्रक्रियेतील जागा : स्टाफ नर्स-71, मनोरुग्ण नर्स-1, सीटीस्कॅन टेक्निशियन-2, एक्सरे टक्निशियन-5, फिजिओथेरपिस्ट-3, पॅरामेडिकल वर्कर-2, डेंटल आरोग्यतज्ज्ञ-1, डेंटल असिस्टंट-1, कॉन्सिलर-2, आयुष एमओ (पीजी)-1, आयुष एमओ(यूजी)-3, ऑडिओलॉजिस्ट अ‍ॅन्ड स्पीच थेरपिस्ट-1, फिजिओलॉजिस्ट-1, सुपरवायझर-1, कोल्ड चेन टेक्निशियन-1, ऑडियोमेट्रिक असिस्टंट-1, ब्लड बँक टेक्निशियन-3, ट्यूटर-2, जिल्हा कम्युनिस्ट मॅनेजर-1, अकाउंटंट-1 या जागांचा समावेश असून यातील स्टाफ नर्स, कॉन्सिलर, फिजिओलॉजिस्ट, सुपर वॉयझर या जागा भरणे शिल्लक राहिले असून उर्वरित जागा पदभरती देण्यात आलेली आहे. या झालेल्याही भरतीची चौकशी होणे अपेक्षित आहे.

तब्बल तीन याद्या प्रकाशित : सदरील पदांच्या भरतीसाठी सप्टेंबर 2021 मध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. यातून उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर पात्रतेच्या याद्या जाहीर केल्या. यातूनच आर्थिक व्यवहारातून गुण वाढवत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. पण या याद्यांवर आक्षेप आल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल होताच जिल्हाधिकारी गोयल यांनी यात लक्ष केंद्रीत करत त्या याद्या रद्द करून 15 जून 2022 रोजी तिसरी पात्र यादी प्रात्यक्षिक गुण वगळता जाहीर केली. ही यादी जाहीर झाल्याने मोठा आर्थिक गैरव्यवहार पहिल्या दोन याद्या करताना झाल्याची चर्चा पुढे येत आहे.

समितीतील अधिकारी : कंत्राटी पदभरती प्रक्रियेतील अनागोंदी कारभाराच्या तक्रारीनंतर समितीकडून संबंधित अधिकार्‍यांची कसून चौकशी करण्यात आली. या समितीत औरंगाबाद येथील आरोग्य उपसंचालक डॉ.सुनिता गोल्हाईत, सहायक संचालक डॉ.भुषणकुमार रामटेके, हिंगोलीचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, हिंगोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, औरंगाबादचे (हिवताप) सहायक संचालक डॉ. दत्तात्रय घोलप, हिंगोलीचे जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ.सचिन बाहेकर, औरंगाबादचे विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक अंकुर सोळुंके, हिंगोलीचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news