परभणी : धुमस्टाईलने मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न; दोघे चोरटे पोलिसांच्या ताब्यात
चारठाणा; पुढारी वृत्तसेवा : चारठाणा येथून जवळच असलेल्या पिंपरी गीते येथील शेतकरी महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी केला. परंतु महिलेने वेळेत सावधगिरी बाळगल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. याबाबतची माहिती चारठाणा पोलिसांना कळताच सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांनी औंढा पोलिसांना कळवले. त्यावरुन नांदेड गुन्हा अन्वेषण विभागाने दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, औरंगाबाद महामार्गावरील चारठाणा जवळ असणाऱ्या पिंपरी गिते येथील उषा कैलास गिते ही महिला शेतातून घराकडे येत होती. त्यावेळी दुचाकीवरून दोन आनोळखी इसम तेथे आले. 12000 रु किंमतीचे गळ्यातील मंगळसूत्र व मणी बळजबरीने ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागले; परंतु उषा गिते यांनी प्रतिकार केल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. त्यानंतर चोरट्यांनी धूम ठोकली.
उषा यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून 6 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली. त्यानंतर चारठाणा सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांनी याची माहिती औंढा पोलिसांना दिली. त्यानंतर नांदेड गुन्हे अन्वेषण शाखेने तपास कार्यास गती देत या दोघा चोरट्यांना जेरबंद केले.

