जालना : पेरणीच्या तोंडावर खते गायब

जालना : पेरणीच्या तोंडावर खते गायब

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग मुबलक खते उपलब्ध असल्याचा दावा करीत असतांनाच दुसरीकडे कृषी केंद्रात विविध खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकर् यांना खतासाठी एका दुकानातुन दुसर्‍या दुकानात खते खरेदीसाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने केवळ कागदी घोडे नाचवीत नेहमीप्रमाणे खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन जादा दराने खते विकणार्‍यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

खरीप हंगामातील पिकासाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खतांची जाणीवपूर्वक कृत्रिम टचाई निर्माण करून, या खतांची सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा दराने विक्री केल्यास संबंधित कृषिसेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी नुकताच दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी व शनिवारी जालना शहरातील अनेक खत विक्रेत्यांकडे विविध प्रकारची खते उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यात अनेक भागात पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. पेरणीसाठी खते खरेदी करण्यासाठी विविध कृषी केंद्रावर शेतकर्‍यांची गर्दी होत आहे. पेरणीयोग्य म्हणजे 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकर्‍यांनी पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

जिल्ह्यात रासायनिक खतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीआहे. कृषी सेवा केंद्राने ज्यादा दराने विक्री केल्याची तक्रार शेतकरी जिल्हा तक्रार निवारण कक्षाच्या 9823915234 या क्रमांकावर करू शकतात किंवा तालुका स्तरावरील पंचायत समितीच्या कृषी विभागात तक्रार निवारण कक्षात करू शकतात. ज्यादा दराने बियाणे व खते विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित कृषि सेवा केंद्राचा परवाना रद्द अथवा निलंबित करण्यात येईल. सर्व कृषी सेवा केंद्रांनी एमआरपी दरानुसारच खतांची विक्री करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी केले आहे

येथे तक्रार नोंदवा

जिल्ह्यातील कोणताही खत विक्रेता निश्चित किमतीपेक्षा जास्त दराने बियाणे व खतांची विक्री करत असल्यास त्याबाबतची तक्रार करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. शेतकर्‍यांनी मोबाईल क्र. 9823915234 या क्रमांकावर तक्रार नोदवावी. तालुका स्तरावर तक्रार नियंत्रण कक्षाकडे किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेकडेतक्रार नोंदवावी.

अशा आहेत खतांच्या किमती

युरिया-266.50 , डी.ए.पी-1350, एमओपी-1700, 20:20:0:13-1470, 15:15:15-1470,10:26:26-1470 अशा खतांच्या किंमती आहेत. मात्र यातील बहुसंख्य खते बाजारातुन गायब असल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news