छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठात फिरते पथक, सीसीटीव्ही वाढवणार

मराठवाडा विद्यापीठ
मराठवाडा विद्यापीठ

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॅम्पसमध्ये अपघाताचे सत्र सुरूच असून रविवारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मंगळवारी पुन्हा एक अपघात झाला, यामध्ये महिला जखमी झाली आहे, कॅम्पसमध्ये धावणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी तसेच फोटोशूट व टवाळखोरांवर लगाम लावण्यासाठी आता कॅम्पसमध्ये सीसीटीव्हीची संख्या वाढवून फिरते पथकही नेमण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, प्रशासनाकडून करण्यात आलेल्या अनेक उपाययोजनानंतरही भरधाव वाहनांनारोखण्यासाठीचे उपाय फोल ठरत आहेत. रविवारी कॅम्पसमध्ये विद्यापीठाच्याच एका कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. मंगळवारीही जर्नालिझम विभागासमोर दुचाकी शिकत असलेल्या एकाने रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला धडक दिली, या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणी बोलताना कुलसचिव डॉ. भगवान साखळे म्हणाले की, विद्यापीठ कॅम्पसमध्ये लवकरच आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे, या शिवाय विद्यापीठ परिसरामध्ये वाहनांना प्रतितास २० वेग ठेवावा लागणार आहे, या संदर्भात ठिकठिकाणी ठळक अक्षरात बोर्डही लावण्यात येणार आहे, विद्यापीठात अनेक लोक दुचाकी, चारचाकी वाहन प्रशिक्षणासाठी येत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे प्रकार रोखण्यासाठी परिसरामध्ये फिरत्या पथकाची नेमणूक करण्यात येणार असून या शिवाय आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्यात येऊन वाहनांवरही वॉच ठेवता येणार असल्याचे डॉ. साखळे यांनी सांगितले.

विद्यापीठ कॅम्पसमध्ये बाहेरचे विद्यार्थी येऊन धुडगूस घालतात यातून या ठिकाणी सातत्याने लहान मोठे भांडण होत असते, विद्यापीठ प्रशासनाकडून संपूर्ण कॅम्पसमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूकही केली असली तरी वेगाने वाहने चालवणे, भांडणांचे प्रकार सुरूच आहेत. अनेकदा भरधाव वाहने घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठाशी काहीही संबंध नसतो, शहराच्या विविध भागांतून हे तरुण येथे येतात, अशा टवाळखोरांवर लगाम लावण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news