छत्रपती संभाजीनगर : तोंडात बोळा कोंबून झुडपात फेकले अर्भक; कोटला कॉलनीतील प्रकार

छत्रपती संभाजीनगर : तोंडात बोळा कोंबून झुडपात फेकले अर्भक; कोटला कॉलनीतील प्रकार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: अवघ्या पाच ते सात दिवसांच्या मुलाला (अर्भक ) कॅरिबॅगमध्ये गुंडाळून तोंडात बोळा कोंबून झुडपात फेकून दिले. कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिराजवळील रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर गुरुवारी (दि. २६) हा प्रकार समोर आला. बाळाची प्रकृती ठीक असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. बाळाला फेकून देणाऱ्या अज्ञात माता-पित्यांविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, अंमलदार विलास चव्हाण हे फिर्यादी आहेत. २५ मे रोजी ते चालक अनिल पवार यांच्यासह डायल ११२ मोबाइलवर ड्युटीला होते. त्यांना शनि मंदिराजवळील झुडपामध्ये बाळ रडत असल्याचा कॉल आला. ते तत्काळ घटनास्थळी धावले. तेथे दोन महिला हजर होत्या. त्यांपैकी एकीच्या हातात पाच ते सात दिवसांचे पुरुष अर्भक होते. अधिक माहिती घेतल्यावर हे अर्भक येथील झुडपात फेकून दिल्याचे आढळल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अर्भकाला घाटीत दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक निरीक्षक डॉ. विशाल इंगळे करीत आहेत

सीसीटीव्ही तपासणे सुरू

शनि मंदिराजवळील झुडपात कॅरिबॅगमध्ये गुंडाळलेले अर्भक टाकण्यासाठी नेमके कोण आले असेल? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. एक महिला पिशवी घेऊन आली होती. जाताना तिच्याकडे पिशवी नव्हती, अशी माहिती त्या भागातील लोकांनी पोलिसांना दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news