औरंगाबाद : शिवसेनेसोबत मी गद्दारी करणार नाही : आमदार उदयसिंग राजपूत

औरंगाबाद : शिवसेनेसोबत मी गद्दारी करणार नाही : आमदार उदयसिंग राजपूत

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : मी शिवसेना पक्षामुळे आमदार झालो असून मी शिवसेनेशी गद्दारी करणार नसून मी शिवसेनेसोबतच आहे, अशी माहिती कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी दूरध्वनीवरून प्रतिनिधीशी बोलताना दिली.

शिवसेनेचे गटनेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार गुजरातमधील सुरत येथे जाऊन थांबल्याने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला असून कधीही सरकार कोसळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. यात तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर झळकल्या होत्या. यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होती. प्रत्यक्ष खरी स्थिती जाणून घेण्यासाठी आमदार राजपूत यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला असता त्यांनी ही माहिती दिली. विधान परिषदेचे मतदान असल्याने माझा मोबाईल बंद होता.

यामुळे प्रसार माध्यमातून चुकीच्या बातम्या आल्या. मी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासोबतच वर्षा बंगल्यावर आहे. मला सेनेने उमेदवारी दिली व मी आमदार झालो. मला गद्दारीचा टिळा लावून घ्यायचा नाही. मी सुखरूप शिवसेनेत आहेत. तालुक्यातील जनता व शिवसैनिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. आगामी राजकीय परिस्थिती काय होईल ते होईल. मी मात्र ज्या पक्षाने मला उमेदवारी देऊन आमदार केले त्या पक्षाची व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याची माहिती आमदार राजपूत यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news