

औरंगाबाद; गणेश खेडकर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची शिवसेनेला कानोकानी खबर लागली नाही, असे सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात बंडखोरांनी महाराष्ट्र सोडला त्याच वेळी गृह मंत्रालयाला खबर पोचली होती. कारण, बंडात सहभागी मंत्री आणि आमदारांनी महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा थेट सुरतपर्यंत वापरली. महाराष्ट्र सोडताच सुरक्षेत तैनात पोलिसांनी नियंत्रण कक्षाला माहितीही पुरविली, परंतु गृह मंत्रालयाच्या हलगर्जीपणाचे परिणाम आता महाविकास आघाडीला भोगावे लागत आहेत.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांचा एक मोठा गट घेऊन बाहेर पडले. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप आला. या बंडखोरीची सरकारला खबर लागली कशी नाही, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. मंत्री, आमदार यांच्यासोबत पोलिस सुरक्षा असते, मग ते कुठे जात आहेत, हे समजले कसे नाही, असा सवाल अनेकजण करीत आहेत. याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता वस्तुस्थिती समोर आली. बंडखोरांनी रात्री ठाणे येथील महापौर बंगल्यावर जेवण केले. त्यानंतर रात्री उशिरा ते कारने सुरतच्या दिशेने निघाले. जोपर्यंत ते महाराष्ट्रात होते, तोपर्यंत सुरक्षा व्यवस्थेतील कोणालाही काहीच शंका आली नाही. त्यांनी महाराष्ट्र सोडला तेव्हा सुरक्षा यंत्रणेला हा प्रकार लक्षात आला असेल, पण ताफा सरळ जात असल्याने त्यांनीही काही आक्षेप घेतला नाही. केवळ आपल्या नियंत्रण कक्षाला तशी माहिती दिली. तेव्हाच एकनाथ शिंदे हे गुजरातकडे जात असल्याचे गृहविभागाला समजले होते, परंतु त्यांनीही याबाबत फारसे गांभीर्याने घेतले नाही. सुरक्षा यंत्रणा थेट सुरतमधील त्या हॉटेलपर्यंत पोहोचली. तेथे मंत्र्यांनी खालीच थांबण्यास
सांगितले, तेव्हा पुन्हा नियंत्रण कक्षाला कळविले. मात्र, तोपर्यंत बंडखोरीच्या बातमीने एकच खळबळ उडवून दिली होती. हा सर्व प्रकार समजल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने सुरक्षा यंत्रणा माघारी परतल्याचे, सूत्रांनी कळविले.
चौकशी होऊ शकते : बंडखोर मंत्री, आमदार यांच्यासोबत असणार्या सुरक्षा व्यवस्थेतील अधिकार्यांची त्यांच्या वरिष्ठांकडून चौकशी होऊ शकते. मुळात त्यांनी राज्य सोडतानाच हा संदेश तत्परतेने नियंत्रण कक्षाला द्यायला हवा होता. दिला असेल तर, नियंत्रण कक्षाने तो गांभीर्याने घेऊन पुढे कळवावयास हवा होता, असे सूत्रांनी सांगितले.
मंत्र्यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटची (एसपीयू) सुरक्षा असते. पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा एक अधिकारी आणि तीन ते चार कर्मचार्यांची एक टीम सोबत दिली जाते. त्यांना एक वाहनही दिले जाते. मंत्र्यांना दुसर्या टीमकडे सोपवेपर्यंत पहिली टीम सोबत असते. महाराष्ट्रभर त्यांना सोबत राहावे लागते. मंत्र्यांनी थांबा, असे सांगितल्यानंतर ते थांबतात आणि त्यांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून तशी नोंद घेतात. मंत्री एखाद्या हॉटेलात किंवा कोणाच्या घरी गेले आणि तेथे गेल्यावर त्यांनी एसपीयूच्या टीमला खालीच थांबविले तरीही टीममधील अधिकारी त्यांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून कळवितात. मंत्र्यांनी बंदोबस्त नाकारल्याची नोंद घेतली जाते. यावरून मंत्र्यांची प्रत्येक हालचाल गृहविभागाला मिळत असते.