

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असतानाच मंगळवारी (दि. 28) दिवसभरात शहरात 24 व ग्रामीण 2 असे एकूण 26 नवे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा चिंतेत पडली, तर सलग दोन दिवसांपासून सुरू असलेले मृत्यूचे सत्र मंगळवारी थांबल्याने यंत्रणेला किंचित दिलासाही मिळाला आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे नव्याने आढळणार्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरून चौथ्या लाटेचे संकेत दिसून येत आहेत. मंगळवारी दिवसभरात शहरातील विविध भागांतून कोरोनाचे 24 नवे रुग्ण आढळले, तर ग्रामीण भागात 2 नव्या रुग्णांची भर पडली. असे दिवसभरात तब्बल 26 नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 123 वर पोहोचली आहे. यातील 23 रुग्ण घाटीसह विविध खासगी रुग्णालयांत उपचार घेत असून 100 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.