औरंगाबाद : दानवेंकडून ‘मातोश्री’वर काळी जादू; गद्दारी करूनही बक्षिसी मिळाल्याचा आरोप

File Photo
File Photo

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाशी गद्दारी केली, त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पडला. त्यावेळी पक्षाने अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना बक्षिसी देत, आमदार केले. आता जिल्ह्यातील पाच आमदार सोडून गेले. त्यानंतर पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेते केले. त्यामुळे त्यांची हुकूमशाही वाढली. दानवे यांनी 'मातोश्री'वर काळी जादू केली असावी, त्यामुळेच त्यांना प्रत्येकवेळी शिक्षेऐवजी बढती मिळते, असा आरोप शिंदे गटात प्रवेश केलेले शिवसेनेचे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्रिवेदी यांच्यासह शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, फुलंब—ीचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे आणि फुलंब—ी बाजार समितीचे सभापती चंद्रकांत जाधव यांची उपस्थिती होती. त्रिवेदी म्हणाले, की प्रत्येक निवडणुकीला आम्ही कन्नड, पैठण, वैजापूर या मतदारसंघांत जीव तोडून काम केले. मात्र, त्या मोबदल्यात आमच्याकडून जवाबदारी काढून घेण्यात आली.

याउलट लोकसभेच्या वेळी दानवे यांनी पक्षविरोधी काम केले. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला, तरीदेखील दानवे यांना विधान परिषदेचे आमदार करण्यात आले, त्यानंतर प्रवक्ता आणि आता विरोधी पक्षनेता पद देऊन बक्षिसी देण्यात आली. आमचा त्यालाही विरोध नव्हता, परंतु आता त्यांनी आमच्या अधिकारांवरही गदा आणली. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आम्हांला पक्षाला जय महाराष्ट्र करावा लागला, असे त्रिवेदी म्हणाले.

शिंदे गटाच्या शाखा

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी यावेळी संघटन उभारणीवर भर दिला जाणार असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, की शहरात आता वॉर्डावॉर्डात नव्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी शाखा कार्यालय असेल. तिथे बसून शाखाप्रमुख, गटप्रमुख सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील. यासोबतच गटप्रमुखापासून उपविभागप्रमुख, विभागप्रमुख, शहरप्रमुख या सर्व पदांवरही नियुक्त्या केल्या जातील असेही जंजाळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news