

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय योगदिन मंगळवारी (दि.21) शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात भारतीय सैन्य, विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांसह शासकीय-खासगी संस्था कार्यालयांत योगदिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या योग प्रात्यक्षिकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह, शासकीय अधिकारी, व्यावसायिक, वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर आणि ज्येष्ठांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते.
जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांसमोर भारतीय सैन्याच्या अग्निबाज विभागांतर्गत स्योर स्विफ्ट स्ट्राइकर्स बि—गेडद्वारे स्वर्णिम विजय वर्षानिमित्त भारतीय सैनिकांनी आठवा जागतिक योग दिवस योगासने करत उत्साहात साजरा केला. भारतीय जवान, त्यांचे कुटुंबीय, नागरिक, जिल्हा प्रशासन, पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, केंद्रीय पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय आदी विभागांतील अधिकारी, कर्मचार्यांसह आयोजित या कार्यक्रमात एकूण 600 योगप्रेमींनी योगासने केली व योग दिवस साजरा केला. तसेच केंद्रीय विद्यालयाच्या 200 विद्यार्थ्यांनीही योग कार्यक्रमात योगासने केली. जीवनात निरोगी राहायचे, तर योग करणे आवश्यक असल्याचा या कार्यक्रमाद्वारे संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी 6 जून ते 19 जूनपर्यंत योग कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये आयुष संकेतस्थळावर उपलब्ध व्हिडिओ व इतर मुक्त सामग्रीचा योगासनाबद्दल जागरुकतेसाठी उपयोग करण्यात आला. सैन्याद्वारा आयोजित या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी उत्साहात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सपत्नीक सहभाग घेत योगासने केली. त्यांनी यावेळी योगा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्नल मनीष तिवारी यांनी केले. सूत्रसंचालन आरजे तेजा यांनी केले.