औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) ने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जाधववाडी येथे 300 पेक्षा अधिक बसेससाठी आधुनिक बसडेपो तयार करण्याचे काम सुरू केले असून, येत्या 15 महिन्यांत बसडेपो तयार होईल, असे स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्नान खान यांनी सांगितले.
सध्या स्मार्ट बसच्या पार्किंग आणि देखभालीसाठी मुकुंदवाडी येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जुन्या बसडेपोचा वापर करण्यात येतो, बससेवेची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी, स्मार्ट सिटीच्या मालकीच्या बसडेपोची आवश्यकता आहे, त्यानुसार जाधववाडी भाजी मंडईनजीक साडेसात एकर जागेवर 25 कोटी रुपये खर्च करून मुंबई येथील डीबी इम्नान या कंपनीच्या माध्यमातून बसडेपो उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, येत्या 15 महिन्यांमध्ये बसडेपो तयार होणार असल्याचा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला.
या ठिकाणी 250 डिझेलवर चालणार्या बसेस आणि 50 इलेक्ट्रिकल बसेसच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे, याशिवाय खासगी बसचालकांना पे अॅण्ड पार्कचीही या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जागेला कव्हर करण्यासाठी 750 मीटर लांब आणि 8 फूट उंच काँक्रिट कंपाउंड वॉल बांधण्यात येणार आहे, भिंतीच्या आत डेपोभोवती हरित पट्ट्यासाठी 3 मीटरचा बफरही ठेवण्यात येणार आहे. डेपोमध्ये 4 मेंटेनन्स-बे असतील ज्यामध्ये पूर्णपणे स्वचालित बस वॉशिंग सिस्टम असेल. दरम्यान, 1435 चौरस मीटर क्षेत्रफळावर कार्यशाळा आणि प्रशासनासाठी इमारत बांधली जाणार आहे.
बस विभागासाठी प्रशासकीय कार्यालय, मेकॅनिक, चालक आणि वाहकांसाठी विश्रांतिकक्ष आणि मुख्य चालन व्यवस्थापकाचे कार्यालय असेल. इमारत ग्रीन बिल्डिंग मानकांवर बांधण्यात येणार आहे. बस डेपोला भविष्यात इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा पर्यायही उपलब्ध राहणार आहे.