औरंगजेबाच्या पोस्टरबाजीचे छत्रपती संभाजीनगर शहरात पडसाद !

औरंगजेबाच्या पोस्टरबाजीचे छत्रपती संभाजीनगर शहरात पडसाद !
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरूच असून, आता शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यापर्यंत शांततेच्या मार्गाने कँडलमार्च काढण्याचा निर्णय एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी घेतला आहे. आंदोलनात पहिल्या दिवशी मोठ्यासंख्येने सहभागी झालेल्या पक्षाच्या माजी नगरसेवक, नगरसेविकांपैकी अनेकांची दुसऱ्या दिवशी गैरहजेरी दिसून आली.

राज्य आणि केंद्र सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले आहे. या निर्णयाविरोधात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार जलील यांनी शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. यात पहिल्या दिवशी एमआयएमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेविक, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर विविध भागातील मुस्लिम समाज बांधवांनीही आंदोलनात हजेरी लावल्याचे दिसून आले, परंतु या आंदोलनादरम्यान अचानक काही तरुणांनी औरंगजेबचे पोस्टर झळकावले. त्यामुळे काही काळ आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकारानंतर त्यांनी पोस्टरबाजी करणाऱ्यांना हुसकावून लावले. या घटनेनंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एमआयएमवर टीका केली. दरम्यान, पोस्टर झळकविणाऱ्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या दिवशी घडलेल्या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आंदोलनात गर्दीचे प्रमाण थोडे कमीच दिसून आले. परंतु दुपारनंतर पुन्हा आंदोलकांनी गर्दी केली होती. मात्र त्यात एमआयएमचे माजी नगरसेवकांपैकी अनेक जणांनी दांडी मारल्याचेही दिसून आले. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यापर्यंत शांततेच्या मार्गाने कँडल मार्च काढण्यात येईल, असे खा. जलील यांनी सांगितले.

'औरंगजेब चौक' चा डाव उधळला

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळासमोर रस्त्यावरील दुभाजकावर रात्रीतून आलमगीर औरंगजेब चौक असा नामफलक लावला होता. ही बाब लक्षात येताच मनसैनिकांनी कुठलेही राजकारण न करता प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने हा नामोल्लेख तत्काळ मिटवण्यात आला. चिकलठाणा विमानतळासमोरील दुभाजकावर कुंडीला हिरवा रंग फासून त्यावर आलमगीर औरंगजेब चौक असा नामफलक लावण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला होता. हिंदुत्त्ववादी संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. यामुळे वातावरण बिघडण्याची शक्यता लक्षात येताच मनसैनिक महेंद्र खिरे, सागर राजपूत, यांनी मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुरडकर यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले तसेच हा प्रकार पोलिस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, स्थानिक पोलिस निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिला. प्रशासनाने तत्काळ दखल घेत चौकातील नामोल्लेख मिटवला.

औरंगजेबाचे पोस्टर, चौघांविरुद्ध गुन्हा

शहराच्या नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएमच्या नामांतरविरोधी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारपासून साखळी उपोषण सुरु केले. त्यात औरंगजेबाचे पोस्टर झळकावण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी स्वतःहून अनोळखी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सहाय पोलिस उपनिरीक्षक मीर आरेफ अली मीर फारूख अली यांच्या फिर्यादीवरून सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news