आमदारांना लालदिव्याची प्रतीक्षा; नेत्यांकडे फिल्डिंग

आमदारांना लालदिव्याची प्रतीक्षा; नेत्यांकडे फिल्डिंग
Published on
Updated on

नांदेड : विश्‍वास गुंडावार : राज्यातील राजकीय समीकरण झपाट्याने बदलत आहे. 'सर्वोच्च' निर्णयाने भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भाजपा अजूनही पडद्यामागून भूमिका बजावत असली तरीही सत्तास्थापनेचे त्यांचे प्रयत्न लपून राहिले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमागेही भाजपच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजप आणि शिंदे गटाने मिळून सत्ता स्थापन केल्यास लालदिवा मिळविण्यासाठी भाजपचे चार आमदार सक्रिय झाले आहेत. हे चौघेही सध्या मुंबईत असून आपल्या नेत्यांमार्फत त्यांनी फिल्डिंग लावली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षीय राजवटीत जिल्ह्यात युतीचे पाच विधानसभा सदस्य असतानाही भाजप किंवा शिवसेनेने मंत्रिपदासाठी कोणालाही संधी दिली नाही. या आमदारातील त्यावेळचे शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे तर लालदिव्याचे प्रबळ दावेदार होते, पण शिवसेना पक्षप्रमुखांनी या मन्याडी वाघाला दाद न देता जालन्याच्या अर्जुन खोतकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लावली होती. सध्या चिखलीकर हे भाजपचे खासदार असल्याने त्यांची मंत्रिपदाची संधी यावेळीही हुकली आहे.

तुषार राठोड (मुखेड), राजेश पवार (नायगाव), भीमराव केराम (किनवट) हे भाजपचे तीन विधानसभा सदस्य आणि राम पाटील रातोळीकर विधान परिषद सदस्य असे भाजपचे जिल्ह्यात चार आमदार आहेत. आमदार तुषार राठोड हे दुसर्‍यांचा विजयी झाले आहेत. त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह मुंबई गाठून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आ. राठोड हे उच्चविद्याविभूषित असून लालदिव्यासाठी इच्छुक आहेत. मुखेडलगतच्या नायगाव मतदारसंघात भाजपच्या चिन्हावर पण रिपाइंच्या कोट्यातून निवडून आलेले राजेश पवार हेही मंत्रिपदाच्या स्पर्धेत असून त्यांनीही मुंबईत केंद्रीय मंत्री व पक्षनेते रामदास आठवले यांची भेट घेऊन याविषयी बोलणी केली असल्याचे समजते. किनवटचे आमदार भीमराव केराम हे सुद्धा मंत्रिपदासाठी सक्रिय झाले आहेत. त्यांनी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी मंत्रिपदावर दावा सांगितल्याची माहिती पुढे आली.

मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ चारवरून एकवर घसरले. या पक्षाकडून निवडून आलेले बालाजी कल्याणकर हे एकमेव आमदार आहेत. आ. कल्याणकर आता शिंदे गटात सामील झाले असल्याने जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार राहिला नाही. आ. कल्याणकर हे अत्यंत नवखे असल्याने त्यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा नाही. शिंदे गटाकडून ज्या संभावित मंत्र्यांची नावे सांगितली जात आहेत. त्या नावांमध्ये कल्याणकर यांचा नावाचा समावेश नाही.

पण भाजप – रिपाइंच्या नवख्या राजेश पवार यांनी मात्र लालदिव्यासाठी उसळी मारली आहे. भाजपच्या तिघांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याने या पक्षाकडे आणखी एक पर्याय आहे, तो पक्षाचे अनुभवी, प्रामाणिक माजी जिल्हाध्यक्ष व विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर यांचा. रातोळीकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यात पक्ष सांभाळला.

मुख्यमंत्र्यांनी त्यांना विधान परिषदेवर घेतले. पक्ष संघटनेतील व्यक्तीला संधी देण्याचा निकष राहिला तर रातोळीकर हे इतर इच्छुकांपेक्षा सरस मानले जातात. पक्षातील ज्येष्ठ तसेच संघ परिवारातील मंडळींनाही रातोळीकर योग्य वाटतात असे सांगण्यात आले. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना अनेक वर्षांपासून लालदिव्याची प्रतीक्षा आहे. परंतु यंदा ते आमदार नसल्याने त्यांना संधी मिळणार नाही, असे असतानाही जिल्ह्यातील पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे असल्याने मंत्रिपद देताना त्यांचे मतही विचारात घ्यावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news