वर्धा, पुढारी वृत्तसेवा : यवतमाळकडून वर्ध्याकडे जात असलेल्या कारने अचानक पेट घेतला. दैव बलवत्तर म्हणून प्रवासी सुखरुप बचावलेत. गुरुवारी १७ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वर्धा ते यवतमाळ मार्गावर सेलसुरा शिवारात ही घटना घडली.
तुळजापूर – नागपूर महामार्गाने यवतमाळ येथील व्यक्ती एमएच ३० एएफ ६९३९ क्रमांकाच्या कारने वर्ध्याकडे जात होते. वर्धा ते देवळी दरम्यान सेलसुराजवळ कारने अचानक पेट घेतला. ही बाब निदर्शनास येताच चालकाने प्रसंगावधान राखत वाहनावर नियंत्रण मिळवत वाहन थांबविले आणि प्रवासी कारच्या बाहेर निघालेत. प्रवासी कारच्या बाहेर निघताच कारमधून आगीच्या ज्वाळा निघू लागल्यात.
देवळी येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने कारची आग नियंत्रणात आणण्यात आली. त्याकरीता जवळपास तासाभराचा वेळ लागला. घटनेची माहिती मिळताच सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी योगेश चन्ने, नरेश काकडे, किशोर साखरे, रवी नेहारे यांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली. कार जळत असल्याने या मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.