

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील बोथी तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेला एक तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला. ही घटना आज (दि.२७) दुपारी २ वाजता घडली. आखाडा बाळापूर पोलीस व गावकऱ्यांनी त्या तरुणाचा शोध सुरू केला आहे.
कळमनुरी तालुक्यातील बोथी येथील दीपक किशनराव मारकळ (वय 21) हा आज दुपारी त्याच्या मित्रासोबत बोथी तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. तलावाच्या पाण्यात पोहत असताना दीपक अचानक खोल पाण्यामध्ये गेला. यावेळी पाण्यात बुडत असताना त्याने मदतीसाठी आरडाओरड केली. दीपक पाण्यात बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या मित्राने त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.
दरम्यान, या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार हिवरे, वानोळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिस व गावकऱ्यांनी पाण्यात बेपत्ता झालेल्या दीपकचा शोध सुरू केला आहे. दुपारी चार वाजेपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
हेही वाचा