हिंगोली : कुटुंबीय छतावर झोपायला गेले अन् चोरट्यांनी साधली संधी; एकाच रात्रीत 3 घरे फोडली | पुढारी

हिंगोली : कुटुंबीय छतावर झोपायला गेले अन् चोरट्यांनी साधली संधी; एकाच रात्रीत 3 घरे फोडली

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तीन घरे फोडून रोख रकमेसह हजारोंचा ऐवज पळविला. तसेच दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार आज (शनिवार) पहाटे उघडकीस आला आहे. सर्वच कुटुंबीय गरम होत असल्‍यामुळे छतावर झोपण्यासाठी गेले होते. त्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला. एक वर्षापुर्वीही अशाच प्रकारे चोरीची घटना घडली होती.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे बहुतांश कुटुंब गर्मीमुळे छतावर झोपण्यासाठी जातात. शुक्रवारी देखील रात्री जेवण करून गावकरी घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री गावात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी अशोक शिंदे यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले. त्यानंतर कपाटातील सोन्या, चांदिचे दागिने व रोख रक्कम चोरट्‍यांनी पळविली.
त्यानंतर चोरट्यांनी कुंडलिक देवराव शिंदे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. शिंदे यांनी हळद विक्री करून ५० हजार रुपये आणले होते. सदर रक्कम चोरट्यांनी पळविली. त्यानंतर चोरट्यांनी संजय किशन शिंदे यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या घरातील 30 हजार रुपये व काही ऐवज पळविला. चोरट्यांनी शाम शिंदे व इतर ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी शिंदे कुटुंबिय जागे झाल्यामुळे चोरटे पसार झाले.

या घटनेमध्ये हजारो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. आज पहाटे तीन ठिकाणची ही कुटुंबे जागी झाल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे तसेच चॅनल गेटचे कुलुप तोडलेले दिसले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी घरात पाहणी केली असता, सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तर घरातील रोख रक्कम व दागिने पळविल्याचे दिसून आले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. अवधुत शिंदे, आबाजी शिंदे यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कुरुंदा पोलिसांना याची माहिती दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button