हिंगोली : जादा तासिकाच्या नावाखाली विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; प्रभारी मुख्याध्यापकाला झोडपले

हिंगोली : जादा तासिकाच्या नावाखाली विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; प्रभारी मुख्याध्यापकाला झोडपले

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील जिल्हा परिषद शाळेत जादा तासिकाच्या नावाखाली विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी शुक्रवारी (दि १०) झोडपले. यानंतर प्रभारी मुख्याध्यापकास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथे इयत्ता सातवीपर्यंत शाळा आहे. या ठिकाणी काम करत असलेले प्रभारी मुख्याध्यापक भगवान अवचार याने मागील काही दिवसापासून इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे जादा वर्ग घेण्यास सुरुवात केली. शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू लागले होते.

मात्र जादा तासिकाच्या नावाखाली अवचार याने विद्यार्थिनींसोबत अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, शुक्रवारी हा प्रकार गावकऱ्यांना समजल्यानंतर पाळत ठेवण्यात आली होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने एका विद्यार्थिनीला वर्गाच्या बाजूला असलेल्या खोलीत बोलावताच गावकऱ्यांनी वर्गात प्रवेश केला. गावकरी आल्याचे पाहून अवचार गडबडला त्यानंतर गावकऱ्यांनी त्यास बेदम झोडपले. त्यानंतर याबाबतची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना दिली.

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग यांनी तातडीने गावात जाऊन प्रभारी मुख्याध्यापक भगवान अवचार यास ताब्यात घेतले. त्याला आखाडाबाळापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणात पुढील कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news