Rajya Sabha elections 2022 : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक रद्द करा : भाजप | पुढारी

Rajya Sabha elections 2022 : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक रद्द करा : भाजप

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या तीन आमदारांनी पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींशिवाय इतरांना मतपत्रिका दाखविल्याने महाराष्ट्रातील संपूर्ण राज्यसभा निवडणूकच रद्द करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्याचवेळी हरियाणातील दोन मतांवर आक्षेप हरियाणातील राज्यसभेची निवडणूकही रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मतमोजणी थांबली असून निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. (Rajya Sabha elections 2022)

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल आणि ओम पाठक यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली. हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ठाण मांडून बसले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांनी आपल्या मतपत्रिका पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींशिवाय इतरांनाही जाहीरपणे दाखविल्या, असा आक्षेप घेत भाजपने सुरुवातीला ही मते पूर्णपणे बाद करावीत, असा आक्षेप घेतला होता. भाजपने हा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदविला होता. राज्य निवडणूक आयोगाने फेटाळल्यानंतर भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. यासंदर्भात त्यांनी व्हिडीओ चित्रीकरण तपासण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. (Rajya Sabha elections 2022)

केंद्रीय निवडणूक आयोगाने व्हिडीओ चित्रीकरणही मागविले आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील राज्यसभा निवडणूक मतदान व मतमोजणी कायदा तसेच 1961 मधील निकाल पाहता या मतदारांचे वर्तन हे सरळ सरळ उल्लंघन असल्याचा आक्षेप भाजपने नोंदविला आहे. यासाठी त्यांनी काही कागदपत्रेही जोडली आहेत. असाच प्रकार हरियाणातही झाल्याचा दावा भाजपने केला आहे. तिथे काँग्रेसचे बी. बी. बात्रा आणि किरण चौधरी यांनी आपल्या मतपत्रिका इतरांना दाखविल्याचा आक्षेप भाजपने नोंदविला आहे.

या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय मतमोजणी होऊ शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. (Rajya Sabha elections 2022)

हेही वाचलतं का?

Back to top button